उत्तर प्रदेशात अराजक

उत्तर प्रदेशात मुजफ्फरनगर या जिल्हा ठिकाणी गेल्या तीन दिवसांपासून दंगल जारी आहे. ही दंगल हिंदू आणि मुस्लिम यांच्या दरम्यान होत आहे आणि तिच्यात ३१ जण मारले गेले आहेत. पण या दंगलीची काही वैशिष्ट्ये स्पष्ट होत असून ती अन्य कोणत्याही दंगलींपेक्षा वेगळी आहेत. मुळात या दंगलीच्या मागे मुलींची छेडाछेडी हे कारण आहे. छेडाछेडी हा आता सामाजिक रोग झाला आहे. स्थानिक पोलीस हा प्रश्‍न मिटवू शकतात पण त्यांना अजून या प्रश्‍नाचे गांभीर्य समजलेले नाही. आता दोन जिल्ह्यांत या प्रश्‍नावरून रस्त्यावर दोन गटांत समोरा समोर येऊन मारामार्‍या सुरू झाल्या आहेत. त्या शस्त्रांनिशी होत आहेत. पश्‍चिम उत्तर प्रदेश हा भाग ऊसवाल्या शेतकर्‍यांमुळे संपन्न झालेला आहे. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणे या जिल्ह्यात अनेकांकडे पिस्तुल आणि बंदुका आहेत. त्यांचा वापर या दंगलींंत मुक्तपणे होत आहे. या संघर्षात ३१ जणांचे जीव गेले आहेत. आता तरी पोलीस छेडाछेेडीच्या विरोधात काही कायमस्वरूपी कारवाई करण्याचा विचार करतील का ?

उत्तर प्रदेशात असे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. गेल्या दोन महिन्यांत छेडाछेडी, बलात्कार आणि खून असे अनेक प्रकार घडले आहेत. या राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडली आहे. मुजफ्फरनगरच्या दंग्याच्या आधी ५० दंगली झाल्या आहेत. त्यात ६० जणांचे बळी गेले आहेत. तिथले समाजवादी पार्टीचे सरकार बरखास्त करावे अशी मागणी होत आहे आणि राज्यपालांनी तशी शिफारस केन्द्राकडे केली असल्याच्या बातम्या पसरल्या आहेत. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचे सरकार सत्तेवर येते तेव्हा तिथे गुंडाराज निर्माण होते असा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच २००७ साली समाजवादी पार्टीचा पराभव करून बसपाचे सरकार सत्तेवर आले होते. पण लोक पाच वर्षात बसपालाही कंटाळले आणि दरम्यानच्या काळात सपाच्या गुुंडाराजला विसरले. त्यांनी २०१२ साली पुन्हा समाजवादी पार्टीला सत्ता दिली पण समाजवादी पार्टीचा मूळ रोग हटायला तयार नाही. २०१२ नंतर या राज्यातली सगळीच स्थिती बदलली आणि राज्यात मारामार्‍या, खून, बलात्कार यांना ऊत आला. जातीय दंगली पेटण्यासाठी दोन समाज गटात काही तरी वैचारिक वाद असावा लागतो. पण आताचे अखिलेश यादव हे अशा कसल्याही वादात पडलेले नाहीत. अशा स्थितीत तिथे मुलीच्या छेडाछेडीवरून वाद सुरू होतात आणि पराकोटीला जातात याचा अर्थ सरकारचे कायदा सुव्यवस्थेवर नियंत्रण नाही असा होतो.

हा सारा प्रकार सुरू असतानाच उत्तर प्रदेशाच्या विविध भागांतून दररोज एक तरी बलात्काराची बातमी येत असते. आता आताच संभळ जिल्ह्यात काही गुंडांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिला जाळून मारून टाकले. हे सरकारच्या निकम्मेपणाचे लक्षण आहे. मुजफ्फरनगर येथील भीषण दंगल तर अनेक बाबतीत वेगळी आहे. ही दंगल हिंदू आणि मुस्लिम यांच्यातली आहे असे समजले जात असले तरी प्रत्यक्षात ती जाट आणि मुस्लिम यांच्यातली आहे. जाट मुलींना त्रास होत आहे असे समजताच या समाजाची महाजात पंचायत बोलावण्यात आली. तिच्यातूनच ही दंगल पेटली. दंगल पेटण्यास मोेबाईल फोनवरून प्रसारित करण्यात आलेले एक दृश्य कारणीभूत ठरले. त्या दृश्यात काही मुस्लिम लोक एका तरुणाला दगडाने ठेचून मारत असल्याचे दाखवले गेले होते. वास्तविक ते दृश्य या शहरातले नसून दोन वर्षांपूर्वीचे होते आणि अफगाणिस्तानातले होते. पण त्यामुळे तणाव वाढला. दंगली पेटवण्यासाठी लागणार्‍य अफवा पसरवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. या माध्यमातून अफवा वेगाने पसरतात हे खरे आहे पण सरकारने आणि पोलिसांनीही आता याचा विचार केला पाहिजे. अफवांचे निराकरण करण्यासाठी पोलिसांनीही तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. तरच अशा दंगली पसरणार नाहीत.

या दंगलीबाबत सुरू असलेल्या चर्चेत ही ठरवून सुरू असल्याचे म्हटले जात आहे. समाजवादी पार्टील मुस्लिमांची मते पाहिजे आहेत तर भाजपाला हिंदूंची मते हवी आहेत. पण जोपर्यंत दंगली होत नाहीत तोपर्यंत या मतांचे ध्रुविकरण होत नाही. म्हणून भाजपा आणि समाजवादी पार्टीनेच या दंगली पेटविल्या असल्याचे जनतेचे मत आहे. कोणत्या ही पक्षावर कोणी असा थेट आरोप करू शकत नाही. कारण तसे पुरावे गोळा झालेले नाहीत. हा सपा आणि भाजपाचा डाव असता तर भाजपाने सरकार बरखास्त करण्याची मागणी केली नसती. भाजपाने दंगल पेटवली नाही पण पेटलेली दंगल आपल्या फायद्यासाठी वापरली आहे. अशा प्रकारात केवळ भाजपाचेच नेते मुस्लिमांवर कडक शब्दात टीका करू शकतात. त्याचा परिणाम हिंदू मतांवर होत असतो. तसे व्हावे यासाठी मात्र प्रयत्न करतात. सपा नेतेही हिंदूंची पर्वा न करता मुस्लिमांची बाजू घेतात. त्याचा त्यांना राजकीय लाभ होत असतो. तेव्हा दंगली कोणी पेटवल्या याची फार चर्चा न करता, असे नक्कीच म्हणता येते की, या दंगलींचा लाभ एका बाजूला भाजपाला तर दुसर्‍या बाजूने समाजवादी पार्टीला होत असतो.या भारलेल्या वातावरणात कॉंग्रेस आणि बसपा मात्र मौन पाळून आहेत.

Leave a Comment