कोळसा घोटाळाप्रकरणी पंतप्रधान चौकशीला सामोरे

नवी दिल्ली – कोळसा घोटाळ्याप्रकरणी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सीबीआय चौकशीला सामोरे जातील, असं केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी स्पष्ट केल आहे.  सीबीआय आणि पंतप्रधान हे दोघेही कायद्याअंतर्गत येतात. त्यामुळे अधिकृत विनंती केल्यास पंतप्रधान चौकशीला सामोरे जातील, असं कमलनाथ म्हणाले.  कोळसा घोटाळा प्रकरणी औपचारिक विनंती केली गेल्यास पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग सीबीआयसमोर तपासासाठी हजर राहतील, अशी स्पष्टोक्ती केंद्रीयमंत्री कमलनाथ यांनी रविवारी एका दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमात दिली. कायद्याच्या चौकटीत राहून सीबीआय कोणाचीही चौकशी करू शकते. पंतप्रधान हेदेखील कायदा पाळणारे आहेत, असे नाथ यांनी सांगितले. पंतप्रधानांकडे कोळसा खाते काही काळापुरते होते. मात्र याबद्दल त्यांच्याकडे लपवण्यासारखे काहीही नाही, असे ते म्हणाले. विरोधकांनी पंतप्रधानांवर अनेक आरोप लावले आहेत. हे आरोप निर्थक असून त्यांच्यासाठी हा मुद्दा वॉटरगेट ठरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकरणी फायली गहाळ झाल्या, मात्र त्यामुळे पंतप्रधान अप्रामाणिक ठरत नाहीत, असे म्हणत त्यांनी पंतप्रधानांची पाठराखण केली. केंद्र सरकार या प्रकरणाच्या चौकशीत अडथळे निर्माण करत आहे, असे माध्यमांकडून रंगवून सांगितले जात आहे. संबंधित फायली गहाळ झाल्या असल्या तरी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र त्या सापडणारच नाहीत असे गृहीत धरू नये असेही त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment