पुणे – ऑलिंपिक स्पर्धांसाठी कसोशीने देशात खेळाडूंना तयार करण्याची मोहिम हाती घेतलेल्या चीन देशातील ऑलिंपिक व आंतरराष्ट्रीय स्पर्धातील ४८ खेळाडू पुण्यातील रमामणी योग इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले असून येथे त्यांना योगाचार्य बीकेएस अय्यंगार यांच्याकडून प्रशिक्षण दिले जात आहे. अय्यंगार यांनी भारतीय योग शास्त्राला जगाच्या पातळीवर मान्यता मिळवून देण्यात फारच मोलाची कामगिरी बजावली आहे.
पुण्यातील अय्यंगार यांच्या संस्थेत दाखल झालेल्या चिनी पथकातील एक व चीनच्या स्पोर्टस इंज्युरी प्रिव्हेन्शन सेंटर फॉर ऑलिपिक्सचे संचालक झने शी या संदर्भात माहिती देताना म्हणाले की चीनने ऑलिपिक स्पर्धांसाठी खेळाडू तयार करण्याची मोहिम गेली कांही वर्षे हाती घेतली आहे त्याचबरोबर आंतर राष्ट्रीय स्पर्धांसाठी अॅथलेटही तयार केले जात आहे. त्यासाठी खेळाडूंना कसून प्रशिक्षण दिले जात आहे. मात्र त्यामुळे खेळाडूंना दुखापती होण्याचे प्रमाणही वाढते आहे. या दुखापतींना भारतीय योगाच्या अभ्यासाने कसा प्रतिबंध करता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अय्यंगार गुरूजी २०११ मध्ये चीन भेटीवर आले होते तेव्हाच त्यांनी योगाच्या सहाय्याने खेळाडूंची क्षमता वाढविता येते असे प्रतिपादन केले होते. चीनमध्ये या संदर्भात सुरू असलेल्या संशोधनातूनही योगाचा उपयोग लक्षात आला आहे.
अय्यंगार यांनी २०११ च्या चीन भेटीत तेथील अॅथलेट प्रशिक्षण क्रीडा विभागाला भेट दिली होती व या खेळाडूंना योग प्रशिक्षण देण्याची तयारी दाखविली होती. त्यानंतर मार्च २०१२ मध्ये चीनी खेळाडूंचा छोटा संघ पुण्यात येऊन प्रशिक्षण घेऊन गेला होता. त्यानंतरही कांही संघ आले मात्र हा आत्तापर्यंत आलेल्या संघातील सर्वात मोठा संघ आहे असे समजते. या खेळाडूंना आठवड्यातून पाच दिवस रोज तीन तास मार्गदर्शन केले जात आहे. सकाळी दोन तास योग आसने व सायंकाळी एक तास प्राणायाम शिकविला जात आहे असे संस्थेतील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.