पुणे, -मोहंमद फारूख युसूम पवळे हा मुंबई येथे 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील कैदी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना मरण पावला. दम्याच्या विकाराने त्रस्त असल्याने गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला, असे येरवडा पोलिसांनी सांगितले.
मुंबई बॉम्बस्फोटातील कैद्याचा येरवडा कारागृहात मृत्यू
मंगळवारी मध्यरात्री तो मरण पावला, असे पोलिसांनी सांगितले. दमा आणि उच्च रक्तदाबाचा त्याला त्रास होता. 21 ऑगस्ट 2013 रोजी येरवडा कारागृहातील रुग्णालयातच त्याच्यावर उपचार करून त्याला ससूनमध्ये हलविण्यात आले होते. तेथून 31 ऑगस्ट रोजी त्याला पुन्हा येरवडा कारागृहात हलविण्यात आले होते, असे कारागृह अधीक्षक योगेश देसाई यांनी सांगितले.
मोहंमद पवळे हा मुंबई येथे 12 मार्च 1993 रोजी झालेल्या साखळी बॉम्ब स्फोटातील प्रमुख दहशतवादी टायगर मेमन याचा निकटचा साथीदार होता. टायगरच्याच मदतीने तो पाकिस्तानात गेला होता. तेथून शस्त्रास्त्र चालविण्याचे शिक्षण घेऊन परतल्यावर त्याने दादर येथील शिवसेना भवन आणि एअर इंडियाच्या कार्यालयाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार उभ्या केल्या होत्या. त्यात दोषी आढळल्याने मुंबई उच्च न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली होती, तर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेची शिक्षा दिली होती. त्यानुसार तो गेल्या काही वर्षांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता, असे देसाई यांनी सांगितले.
