चीनमध्ये आहे पाच वर्षांचा धाडसी पायलट!

बीजिंग – चीनमध्ये अवघ्या पाच वर्षांचा एक चिमुकला विमान उडवून आजवरचा सगळ्यात कमी वयाचा पायलट बनला आहे. हो यिडे’ असे या चिमुकल्याचे नाव आहे. घरात सगळीजणं त्याला लाडाने डुओडुओ’ म्हणूनच हाक मारतात. ‘डुओडुओ‘ने 21 ऑगस्ट रोजी बीजिंगमधील वन्यजीव पार्कमध्ये तब्बल 35 मिनिटे विमान उडवल्याची नोंद झाली आहे.

अशी कामगिरी डुओडुओने काही पहिल्यांदाच केलेली नाही. तर याआधीही अनेकदा अशाच काही करामती करून अनेकांना हैराण केले आहे. 2012 मध्ये म्हणजेच मागच्याच वर्षी केवळ चार वर्षांच्या डुओडुओला बर्फात अर्धनग्न अवस्थेत बर्फात पळताना अनेकांनी व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले होते. न्यूयॉर्कमध्ये मायनस 13 डिग्री तपमानात त्याच्या कुटुंबीयांनी हा व्हिडिओ बनविला होता. हा व्हिडिओ खूप लोकप्रियही झाला होता, असेही यावेळी म्हटले आहे.

प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, याच चिमुरड्याने एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विमान चालवण्याचा पराक्रमही केला होता. तसेच जबरदस्त वादळात आणि पावसात जपानच्या फुजियामा टोकावरही तो चढला आहे. डुओडुओचे पिता लिएशेंग यांना आपल्या मुलाला साहसी आणि धाडसी बनवायचे आहे. एखादी गोष्ट माहीत करून घेणे आणि ती शिकून घेण्याची इच्छा डुओडुओत निर्माण व्हावी, यासाठी ते प्रयत्नशील आहेत, असेच चित्र एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता दिसत आहे.