सरीन वायू सायनाईडपेक्षा घातक आणि विषारी

वॉशिंग्टन – सीरियामधील यादवीचा बंदोबस्त करण्यासाठी तिथल्या सरकारने वापरलेल्या सरीन या विषारी वायूचे गंभीर परिणाम जाणवत आहेत. हा वायू सायनाईडपेक्षाही ५०० पटींनी घातक असल्याचे तज्ञांचे मत आहे. सीरियन सरकारने त्याचा वापर केल्याचा इन्कार केला असला तरी अमेरिकेतल्या तज्ञांनी त्याचा वापर झाला असल्याचे खात्रिशीर म्हटले आहे. ऑर्गेनो फॉस्फरस या प्रकारातील सरीन गॅस जगाच्या इतिहासात १९३८ साली जर्मनीतल्या नाझी सरकारने पहिल्यांदा वायूअस्त्र किंवा केमिकल वेपन म्हणून वापरला होता.

जी बी या लघुरुपाने ओळखला जाणारा हा वायू जगातला सर्वात घातक वायू असल्याने ज्या भागात तो सोडला जाईल त्या भागातले हजारो लोक काही मिनिटांच्या आत मरण पावू शकतात. मरण्यासाठी हा वायू श्‍वासातून आत ओढून घेतलाच पाहिजे असे नाही. त्वचेच्या रंध्रातून तो शरीरात गेला तरीही माणसाचा मृत्यू ओढवू शकतो. शरीरात गेल्यानंतर तो माणसाच्या मज्जासंस्थेवर आघात करतो आणि माणूस काही क्षणात मरण पावतो.

काही लोकांना हा वायू शरीरात जाताच झटके यायला लागतात. स्नायू शिथिल होतात आणि मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटतो आणि त्याचा मृत्यू ओढवतो. परंतु गॅसच्या हल्ल्यानंतर ताबडतोबीने उतारा मिळाला तर माणूस वाचू शकतो. हा वायू गंधरहित असतो. त्यामुळे त्याचा मारा केला आहे हे लोकांच्या पटकन लक्षात येत नाही. एखाद्या माणसाच्या कपड्यांमध्ये या गॅसच्या कुप्या लपवून त्या गर्दीत फोडल्या जातात आणि त्यातूनही हल्ला केला जातो.

१९८० सालच्या इराक-इराण युध्दामध्ये पहिल्यांदा या विषारी वायूचा मर्यादित वापर केला गेला होता. जपानमध्ये १९९४ आणि ९५ अशी दोन वर्षे झालेल्या काही दहशतवादी हल्ल्यामध्ये सरीन वायू वापरला गेला होता. १९२५ साली जिनेव्हा करारामध्ये हा वायू कोणी वापरू नये. असे ठरले होते आणि त्यावर ८८ देशांच्या सह्या झालेल्या आहेत.