आर्थिक तंगी करते बुद्धीवर परिणाम

कौट्री- पैशांची तंगी माणसावर काय काय परिणाम करते याची जाणीव सर्वसामान्यांना असते. वारविक विद्यापीठातील संशोधक व अर्थशास्त्रज्ञ आनंद मणी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी या संदर्भात केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की पैशांची तंगी माणसाला केवळ लाचारच बनवित नाही तर त्याच्या मेंदूची कार्यक्षमताही ती कमी करते. आर्थिक तंगीमुळे माणसाची तार्किक क्षमता घटते इतकेच नव्हे तर त्याच्या बुद्धयांकही 13 अंकांपर्यंत कमी होतो असेही या संशोधनातून दिसून आले आहे.

रात्रीची झोप पुरेशी झाली नाही तर माणूस दिवसभर अस्वस्थ बनतो तसाच परिणाम तो आर्थिक चणचणीचा सामना करत असेल तरी होतो असे मणी यांचे म्हणणे आहे. मात्र अशा माणसाला पुरेसे पैसे मिळाले तर त्याचा मेंदू पूर्वीप्रमाणे काम करू लागतो असेही या संशोधनात सिद्ध झाले आहे. आर्थिक विवंचना संपुष्टात आली की माणूस पूर्वीच्या क्षमतेने निर्णय घेऊ शकतो आणि कामही करू शकतो तसेच त्याचे बिघडलेले मानसिक संतुलन पूर्वपदावर येते असे मणी यांचे म्हणणे आहे.
—————