गडचिरोली – नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याच्या आरोपावरून गोंदिया जिल्ह्यातील देवरी या गावी एका पत्रकारासह दोघांना अटक करण्यात आली. अटक झालेल्यांची नावे प्रशांत राही ऊर्फ ए.बी. सांगलीकर (वय-५०) आणि विजय तिर्की अशी आहेत. प्रशांत राही हा उत्तराखंडातील ऋषिकेशचा राहणारा आहे तर विजय तिर्की हा छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील बेलोरा गावचा राहणारा आहे.
नक्षलवादी समर्थक पत्रकार अटकेत
प्रशांत राही हा मुक्त हस्त पत्रकार म्हणून कार्यरत होता. या पूर्वी तो उत्तराखंडात पत्रकार म्हणून कार्यरतही होता. काही नक्षलवाद्यांसह हे दोघे जंगलामधून देवरीमार्गे छत्तीसगडच्या अबुजमाडकडे जात असल्याचे पोलिसांना कळाले. त्यावेळी त्यांच्यावर नजर ठेवून पोलिसांनी त्यांना घेरले तेव्हा बाकीचे नक्षलवादी पळून गेले मात्र हे दोघे जेरबंद झाले. त्यांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
या आधी गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेरी तालुक्यातील एका खेड्यामध्ये अशाच रितीने संशयास्पदरित्या वावरणार्या तिघांना अटक करण्यात आली होती. त्या तिघांचे नक्षलवाद्यांशी घनिष्ट संबंध असल्याचे लक्षात आले. त्यात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातला हेम मिश्रा (वय-३२) हा विद्यार्थीही समाविष्ट होता.
