दाऊदला सुध्दा पकडून आणू : शिंदे

नवी दिल्ली – भारत विरोधी कारवाया करणार्‍या एकेका अतिरेक्याला भारतात पकडून आणले जात असतानाच केंद्रीय कृषीमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दाऊद इब्राहिमलासुध्दा पकडून आणले जाईल असे जाहीर केले आहे. आपण एकामागे एका दहशतवाद्याला अटक करत असल्यामुळे याच क्रमाने दाऊदचा सुध्दा क्रमांक लागेल असे ते म्हणाले.

पुढे थांबा, वाट पहा प्रत्येकाला भारतात आणले जाईल आणि न्यायालयासमोर उभे केले जाईल. असे श्री. सुशीलकुमार शिंदे पत्रकारांशी बोलताना म्हटले. दाऊद इब्राहिम हा प्रचंड मोठ्या बेकायदा व्यवहाराचा बादशहा असून १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर पाकिस्तानात पळून गेला आहे. त्याला भारत सरकारने फरारी घोषित केले असून या बॉम्बस्फोट मालिकेचा तोच सूत्रधार असल्याचा आरोप त्याच्यावर लावला आहे.

अमेरिकेलाही दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानात असल्याच्या आरोपाची माहिती आहे आणि तो अल कायदा या संघटनेशी संबंधित असल्याचा अमेरिकेचाही आरोप आहे. आजपर्यंत पाकिस्तानातून पकडून आणलेल्या बहुतेक दहशतवाद्यांनी आपले दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे कबुलही केले आहे आणि तो सध्या पाकिस्तानातच असल्याचे या प्रत्येकाने म्हटले आहे. पाकिस्तान सरकार मात्र दाऊद आपल्या देशात असल्याचा इन्कार केला आहे. त्यामुळे दाऊद इब्राहिमला पकडण्यासाठी आधी पाकिस्तानला तरी शरण आणावे लागेल किंवा तो पाकिस्तानातून बाहेर पडून अन्यत्र कोठे जायला लागला तर तिथे त्याला अटक केली पाहिजे. आजवर अटक केलेल्या बहुतेक दहशतवाद्यांना पाकिस्तानातून पकडून आणलेले नाही तर नेपाळमध्ये पकडलेले आहे.