मुंबई – जादूटोणाविरोधी कायद्याबाबत शिवसेनेच्या भूमिकेत अचानक बदल झालाय. जादूटोणाविरोधी कायद्यात खटकण्यासारखे काहीच नाही, असा साक्षात्कार उद्धव ठाकरे यांना झाला आहे. शिवसेनेने या विधेयकावर अचानक कोलांटउडी कशी काय मारली, याची चर्चा आता रंगू लागली आहे.
जादूटोणाविरोधी कायद्याबाबत शिवसेनेच्या भूमिकेत बदल
जादूटोणाविरोधी कायद्यासंदर्भात उद्धव ठाकरेंची भूमिका बदलली आहे. महत्त्वाचे म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतरही शिवसेना याच भूमिकेवर कायम होती. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याला आठ दिवसही उलटले नाहीत, तोच उद्धव ठाकरेंनी या भूमिकेप्रकरणी चक्क कोलांटउडी मारली आहे.
जादूटोणा कायद्यासंदर्भात अंनिसशी चर्चा केल्यानंतर या कायद्यात खटकण्यासारखे काहीच नाही, असा साक्षात्कार उद्धव ठाकरे यांना झाला आहे. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर खडबडून जागे झालेल्या सरकारने कधी नव्हे इतक्या वेगाने जादूटोणा कायदाविरोधी वटहुकून जारी केला.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जादूटोणा कायद्याला विरोध नसल्याचे राज ठाकरेंनीही स्पष्ट केले. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनाही भूमिका बदलावी लागली. याआधी विरोध करताना शिवसेनेने जादूटोणा कायदा नीट समजूनच घेतला नव्हता, हेच उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले आहे.
