इंधन तेलाच्या दरात वाढ झाली की, महागाईला चालना मिळते आणि आता सरकारने अशी चालना देण्याची सारी सूत्रे आपल्या हातातून तेल कंपन्यांच्या हातात दिली आहेत. त्यामुळे त्यांनी वारंवार दरवाढ करीत पेट्रोलचा दर लीटरमागे साधारणतः २ रुपये ३५ पैसे एवढा तर डिझेलचा दर लीटरमागे ५० पैशांनी वाढवला आहे. ढासळत चाललेला रुपया हे या वाढीमागचे एक मोठे कारण आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलांचे दर जेवढे वाढतील तेवढे आता भारतात लगेच वाढतील हे तत्त्व आता सरकारने स्वीकारले आहेच. तशा या तेलांच्या दरात वाढी होतही आहेत पण रुपयाची किंमत घसरत चालल्यामुळेही वेगळी दरवाढ अटळ ठरली आहे. परदेशात भाव स्थिर असले तरीही मुळात एका डॉलरसाठी आधी ४२ रुपये द्यावे लागत होते तिथे आता ६६ रुपये द्यावे लागत आहेत एवढ्या कारणानेही खनिज तेलाच्या किंमती रुपयांत वाढवणे अटळ झाले आहे. म्हणूनच गेल्या सहा महिन्यात ज्या वेगाने रुपया घसरत आहे त्या वेगाने तेलांचे दर वाढत आहेत. गेल्या ३ महिन्यात पेट्रोलची ही सहावी वाढ आहे आणि या सहा वाढींमध्ये मिळून पेट्रोलच्या दरात लीटरमागे ९ रुपये १७ पैसे एवढी वाढ झालेली आहे.
डिझेलच्या बाबतीतसुध्दा हाच प्रकार आहे. डिझेलच्या दरात झालेली ही सातवी वाढ आहे. डिझेलचे दर या वाढींमधून जवळपास ४ रुपये ७५ पैसे एवढे वाढले आहेत. गेल्या जानेवारी महिन्यामध्ये डिझेलच्या दरवाढीचे अधिकार तेल कंपन्यांना देण्यात आले. तेव्हापासून त्यांनी डिझेलचे दर सातत्याने वाढवत आणले आहेत. कारण त्यांना आता देशातल्या चलनवाढीचा आणि महागाईचा कसलाही विचार न करता दरवाढ करण्याची अनुमती मिळाली आहे. आजवर भारत सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या बाबतीत बरेच सावध होते. आंतरराष्ट्रीय बाजारात या तेलांचे दर वाढले तरी सरकार त्यांच्या दरात देशात वाढ करत नव्हते. अर्थात भारतातल्या ग्राहकांसाठी ती वाढ झाली नसली तरी सरकारला मात्र तेल आयात करताना बाजारभावाप्रमाणे पैसे भरावे लागत होते. परिणामी सरकारला आणि तेल कंपन्यांना मोठा तोटा होत होता आणि सरकार आपल्या तिजोरीतून हा तोटा भरून काढत असल्यामुळे सरकारच्या तिजोरीवर हा भार पडत होता. पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाल्यावर ती ग्राहकांवर बसवली तरी ग्राहकांच्या खिशावरच भार पडणार असतो आणि सरकारने सबसिडी देऊन भाव वाढू दिले नाहीत तरी शेवटी सबसिडीच्या रुपाने का होईना पण ग्राहकांच्याच खिशावर भार पडत असतो.
तेव्हा सरकारने आता सबसिडीचा भार कमी करून तेलाचे भाव वाढविण्याची अनुमती कंपन्यांनाच दिली आणि सबसिडीवरचा भार कमी केला. त्यामुळे आता जागतिक बाजारात बदल व्हायला लागले की देशांतर्गत तेलाचे भावही वाढायला लागतात. म्हणूनच गेल्या तीन महिन्यात सहावेळा पेट्रोलचे दर वाढले. सबसिडीवरचा भार कमी करून पेट्रोलचे दर जागतिक बाजाराशी जोडायचे ठरवले तर या वाढी अपरिहार्यच होत्या. भारतातल्या तेल कंपन्यांना जागतिक स्तरावरच्या दरात वाढ झाल्याने तोटा होत होता. गेल्या तीन महिन्यामध्ये एक लीटर पेट्रोलमागे १२ रुपये १२ पैसे एवढा तोटा वाढला होता. हा वाढलेला भार शेवटी ग्राहकांकडूनच वसूल करावा लागतो. त्यामुळे आता पेट्रोलचे दर वाढवणे गरजेचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी अर्थमंत्री चिदंबरम् आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र लिहून महागाई आणि रुपयाचे मूल्य यांचा इंधन तेलांच्या दरावर कसा कसा परिणाम झाला आहे. हे नमूद केले आहे. चालू आर्थिक वर्षात इंधन तेलाच्या आयातीवर देशाला १ लाख ८१ हजार कोटी रुपयांचे परकीय चलन खर्चावे लागेल असा अंदाज आहे. तेव्हा एवढी मोठी रक्कम डॉलर्सच्या चलनामध्ये खर्च करायची झाली तर ती कसर भरून काढण्यासाठी तेवढी निर्यात करावी लागणारच पण आपण तेवढी निर्यात करीत नाही. देशाची निर्यात वाढत नाही. आयात मात्र वाढत आहे.
खरे तर सरकारला आता निर्यात वाढवण्याचे काही उपाय योजिता येतात पण सरकारचा धोरण लकवा आडवा येत आहे. एप्रिल ते जून २०१३ या तिमाहीत या धोरण लकव्यामुळे उत्पादन वाढीचा अर्थात वट्ट राष्ट्रीय उत्पन्न वाढण्याचा वेग ४.४ टक्के एवढाच नोंदला गेला आहे. गेल्या आठ वर्षातला हा सर्वात कमी वेग आहे. आपली अर्थव्यवस्था ताळ्यावर नाही पण तरीही पंतप्रधान आणि पी. चिदंबरम निर्ढावलेपणाने अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे ठोकून देत होते. ती थाप पचावी म्हणून विकास वेगाचे आकडे पत्रकारांच्या तोंडावर फेकत होते पण आता या आकड्यातही काही गंमत राहिली नाही. मुक्त अर्थव्यवस्था अंमलात येण्यापूर्वी हा वेग पाच टक्के होता. तो कमी वाटला म्हणून उदारीकरणाचा मार्ग पत्करला पण या मार्गानेही उत्पादन वाढीचा वेग न वाढता तो १९९१ च्या स्तराला जात आहे. आताही तेव्हाप्रमाणे सरकारी खजिन्यातले सोने विक्रीला काढण्याची चर्चा सुरू आहे. परकीय चलनाच्या गंगाजळीत आता किती चलन शिल्लक आहे आणि ते आता किती दिवस पुरेल याचा पडताळा घ्यावा लागत आहे. एखाद्या रुग्णाचा जीव किती तासांनी जाईल याची प्रतीक्षा केली जाते तशी अवस्था आली आहे.