इंदूर – कथित संत आसाराम बापू यास एका सोळा वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात अखेर बर्याच नाट्यमय घटनानंतर जोधपूरच्या पोलिसांनी इंदूर येथे अटक केली. पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर अज्ञातस्थळी नेले असल्याचे वृत्त आहे. या प्रकरणात त्यांनी ७२ तासांच्या आत स्वतःहून पोलिसांत हजर रहावे असे त्यांना बजावण्यात आले होते. परंतु त्यांनी हा निर्वाणीचा इशारा दुर्लक्षित केला त्यामुळे त्यांना अखेर अटक करण्यात आली. ७२ वर्षीय आसाराम बापू यांच्यावतीने अनेक वकील कामाला लागले आहेत. परंतु शनिवारी अटक झाल्यामुळे त्यांना सोमवारी न्यायालयासमोर उभे केले जाईल. दरम्यान त्यांना २४ तास तरी पोलिसांच्या कोठडीत रहावे लागेल.
आसाराम बापूंच्या वकिलांनी बापूंवर लावण्यात आलेले आरोप संदिग्ध स्वरूपाचे असल्याचे म्हटले आहे. त्यांनी अटक झाल्यानंतर प्रकृती बिघडल्याचे म्हटले असले तरी पोलिसांनी त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे आणि आसाराम बापू चौकशी करण्या इतपत ठीक असल्याचे म्हटले आहे. आसाराम बापूच्या मुलाने मात्र आसाराम बापूंच्या विरोधात रचलेला हा कट असल्याचे पुन्हा एकदा म्हटले आहे.
आसाराम बापूंच्या काही अनुयायांनी पत्रकारांच्या विरोधात निदर्शने केली आणि त्यांच्यावर हल्ला केला. अशा अनुयायांपैकी ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी जोधपूर येथेही असाच हल्ला करण्यात आल्यामुळे १३ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.