नवी दिल्ली – चालू वर्षीच्या एप्रिल ते जून या तिमाहीत देशाच्या वट्ट राष्ट्रीय उत्पन्नात केवळ ४.४ टक्के एवढी वाढ झाली. ही गेल्या कित्येक वर्षातली सर्वात कमी वाढ आहे. २००८ सालच्या आर्थिक मंदीच्या काळात एका तिमाहीमध्ये ४.८ टक्के एवढा विकास वेग साधला गेला होता. त्यानंतर नोंदला गेलेला हा निचांक आहे.
विकास वेग केवळ ४.४ टक्के
एप्रिल २०१३ ते जून २०१३ या तिमाहीत वीज निर्मिती, गॅस आणि पाणी पुरवठा या क्षेत्रात ३.७ टक्के एवढा विकास वेग साधला गेला. गतवर्षीच्या याच तिमाहीमध्ये हा वेग ६.२ टक्के होता. बांधकाम क्षेत्रामध्ये या वर्षीच्या या तिमाहीत २.८ टक्के एवढी वाढ झाली. जी गतवर्षी ७ टक्के होती. व्यापार, हॉटेल, वाहतूक आणि संदेश वहन या क्षेत्रांमध्ये या वर्षी ३.९ टक्के एवढी वाढ झाली. गतवर्षी ती ६.१ टक्का एवढी होती.
या तिमाहीमध्ये गतवर्षीपेक्षा अधिक वाढ करण्याचा मान सामाजिक क्षेत्राने मिळविला. या वर्षी या क्षेत्रात ९.४ टक्के वाढ झाली. जी गतवर्षीच्या याच तिमाहीत ८.९ टक्के होती. या तिमाहीत विकास वेगाचा निचांक नोंदला गेला असला तरी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीमध्ये तो वाढेल आणि पुढच्या सहामाहीमध्ये तो यापेक्षा कितीतरी जास्त असेल असा विश्वास अर्थतज्ञांनी व्यक्त केलेला आहे. पंतप्रधानांनी मनमोहनसिंग यांनीही विकास वेग कमी नोंदल्याबद्दल खेद व्यक्त केला आहेच परंतु आगामी सहा महिन्यात देशाची परिस्थिती सुधारेल असा विश्वासही व्यक्त केला आहे.
