बंगळुरू – भारताचा पहिला आणि संरक्षण विषयक कामाला पूर्णपणे वाहिलेला जी सॅट हा उपग्रह काल यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला. हा उपग्रह काल दक्षिण अमेरिकेतील फ्रेंच गियाना या देशातील कोराऊ प्रक्षेपण तळावरून यूरोपियन स्पेस एजन्सीच्या एरियन ५ या रॉकेटद्वारा शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे २ वाजता अवकाशात पाठवण्यात आला. या उपग्रहाद्वारे भारताच्या सागरी क्षेत्रातील प्रतिस्पर्धी देशांच्या हालचाली टिपल्या जाणार आहेत. त्यामुळे हा उपग्रह संरक्षण खात्याचा असला तरी तो प्राधान्याने नाविक दलाच्या उपयोगी पडणार आहे.
जी सॅट ७ चे प्रक्षेपण यशस्वी
जी सॅट ७ या उपग्रहाच्या निर्मितीसाठी १८५ कोटी रुपये खर्च आला आहे. त्याचे वजन २० क्विंटलपेक्षाही अधिक आहे. एवढा मोठा उपग्रह अवकाशात नेऊन सोडण्यासाठी आवश्यक असलेला क्रायोजनिक इंजिनाची निर्मिती अजून भारतात होऊ शकलेली नाही. त्यामुळे त्यासाठी यूरोपियन स्पेस एजन्सीची मदत घेण्यात आली आणि त्याचे प्रक्षेपण कोराऊ येथून करण्यात आले.
प्रक्षेपण केल्यानंतर ३४ मिनिटे आणि २५ सेकंदानंतर हा उपग्रह त्याच्या नियोजित कक्षेत जाऊन स्थापित झाला आणि कर्नाटकातील हसन येथे असलेल्या इस्त्रोच्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटी या तळावर उपग्रहाकडून योग्य ते संदेश मिळण्यास प्रारंभ झाला. हा उपग्रह स्थापित झाल्याचे संदेश मिळाले आहे. मात्र त्याचे माहिती गोळा करण्याचे काम सप्टेंबर महिन्याच्या शेवटी सुरू होणार आहे.
