भोपाळ- जोधपूर पोलिसांनी आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांना अल्पवयीन मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी शुक्रवारपर्यंत पोलिस ठाण्यात हजर राहण्याबाबत समन्स जारी केले होते. मात्र बापूंनी आजारी असल्याचे कारण देत हजर राहण्यास नकार दिला. त्या मुळे आता बापूंच्या या अरेरावीला न जुमानण्याचा निर्णय घेत राजस्थान पोलिसांचे बापूंना आणण्यासाठी एक पथक मध्य प्रदेशला शनिवारी रवाना झाले आहे.
शुक्रवारी दिल्लीला जाण्यासाठी आसाराम बापूंनी विमानाची तिकिटे आरक्षित केली होती. पण अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने विमानाची तिकिटे रद्द करण्यात आली असल्याची माहिती बापूंचा मुलगा नारायण साई याने दिली.
अपलोपॅथीच्या औषधांवर बापूचा विश्वास नसल्याने ते फक्त आयुर्वेदिक औषधेच घेत असल्याचे साई याने सांगितले. दरम्यान, बापूंनी दिलेले कारण हे समर्थनीय नसल्याने त्यांना हजर होण्यास वाढीव अवधी देण्यात येणार नाही. जर बापू शुक्रवारी हजर झाले नाही तर बापूंची चौकशी करण्यासाठी एक तुकडी बापू सध्या असलेल्या ठिकाणी रवाना करण्यात येईल असे पोलिसानी सांगितले होते.