उत्तर प्रदेशात ’सप’चे तीन आमदार निलंबित

लखनौ- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी महेंद्रकुमारसिंह यांच्यासह समाजवादी पक्षाच्या तीन आमदारांना निलंबित करण्याचा निर्णय घेऊन सार्‍यांनाच आज आश्‍चर्याचा धक्का दिला. गोव्यातील एका हॉटेलात महेंद्रकुमार यांना वारांगनांसोबत पकडण्यात आले होते. अखिलेश यादव यांनी लगेच त्यांच्यावर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. तर, पक्षाच्या अन्य दोन आमदारांना त्यांच्या पुत्रांनी केलेल्या बेकायदा कृत्यांमुळे कारवाईला सामोरे जावे लागले. रायबरेलीचे आमदार रामलाल अकेला व सीतापूरचे आमदार राधेश्याम जैस्वाल यांना निलंबित करण्यात आले आहे.

अकेला यांचे पुत्र विक्रांत यांनी त्यांच्याच मतदारसंघात एका डॉक्टरांच्या घरावर बुलडोझर चालविला होता; तर जैस्वाल यांचे पुत्र शैलेंद्र याने मजुरांवर गोळीबार केला होता. मुलांच्या गुन्हेगारी कृत्यांबाबत आमदारांना माहिती होती. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते. मार्च 2012 मध्ये मुख्यमंत्रिपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पक्षातील तीन आमदारांना निलंबित करण्याचा अखिलेश यांचा हा सर्वांत मोठा निर्णय असल्याचे मानले जाते.

Leave a Comment