नागपाल यांना क्लीनचिट

लखनऊ – निलंबित महिला आयएएस अधिकारी दुर्गा शक्ती नागपाल यांना क्लीनचीट देणारे गौतम बुध्द नगरचे जिल्हा न्याय दंडाधिकारी रविकांत सिंह यांची बदली झाली आहे. उत्तरप्रदेश सरकारने नागपाल यांना मशिदीची भिंत पाडण्याचा आदेश दिल्याचा ठपका ठेऊन निलंबित केले होते.याप्रकरणी रविकांत सिंह यांनी चौकशी करुन, राज्य सरकारला दिलेल्या अहवालात नागपाल यांना क्लीनचीट दिली होती. मशिदीची भिंत गावक-यांनी स्वत:हून पाडली यात कुठेही जेसीबी मशिनचा उपयोग करण्यात आला नाही असे सिंह यांनी आपल्या अहवालात म्हटले होते.

अहवाल दिल्यानंतर काही दिवसांनी रविकांत सिंह यांची बदली करण्यात आली आहे. सिंह यांच्या बदलीसाठी कोणतेही अधिकृत कारण देण्यात आलेले नाही. नोएडातील सोरखा गावात बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहिम सुरु आहे. या मोहिमेविरोधात मंगळवारी स्थानिकांनी हिंसक आंदोलन केले. सिंह यावेळी घटनास्थळी गेले होते. त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. सिंह यांच्याशिवाय पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास विभागाचे विशेष सचिव कौशल राज शर्मा यांचीही बदली करण्यात आली आहे. वाळू माफियांविरोधात कारवाई करणा-या दुर्गा नागपाल यांच्यावर मशिदीची भिंत पाडण्याचा आदेश दिल्याचा ठपका ठेऊन 27 जुलै रोजी निलंबित करण्यात आले होते.