विधान परिषदेच्या निवडणुकीत मुंडे काका-पुतण्याचं रंगणार युद्ध

मुंबई – विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत काका विरूद्ध पुतण्या असा सामना पाहण्यास मिळणार हे जवळपास निश्चित झालंय आणि हा सामना आहे भाजपचे जेष्ठ नेते गोपीनाथ मुंडे आणि त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्यात. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंची उमेदवारी निश्चित झाली.
तर आज भाजपने आपल्या दोन उमेदवारांचे अर्ज मागे घेऊन अपक्ष उमेदवार पृथ्वीराज काकडेंना पाठिंबा दिलाय. त्यामुळे भाजपने धनंजय मुंडेंच्या अडचणीत भर घातली आहे. राष्ट्रवादीनेही संजय खोडकेंची उमेदवारी मागे घेतलीये. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे विरुद्ध गोपीनाथ मुंडेंनी पाठिंबा दिलेले काकडे असा सरळ मुकाबला होणार आहे.

ही निवडणूक राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांच्यासाठी एकतर्फी होईल अशी चर्चा होती. पण भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी वेगळीच खेळी खेळली. शुक्रवारी अगदी शेवटच्या क्षणी भाजपच्या दोन उमेदवारांबरोबरच बारामतीचे माजी खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक संभाजीराव काकडे यांचे चिरंजीव पृथ्वीराज काकडे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला.

काकडेंच्या अर्जावर भाजप आमदारांच्याच सह्या असल्याने गोपीनाथ मुंडे यांच्याच प्रयत्नांनी काकडेंचा अर्ज दाखल झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत मराठा विरूद्ध वंजारी असा सामना होऊन निवडणुकीची दोरी मराठा तसंच अपक्ष आमदारांच्या हातात देण्याची ही खेळी आहे. राष्ट्रवादीकडे संख्याबळ असलं, तर घोडेबाजाराची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Comment