अर्धी मुर्धी अन्न सुरक्षा

अन्न सुरक्षा विधेयक अखेर लोकसभेत मंजूर झाल्याने सरकारला मोठे धन्य धन्य वाटत असेल म्हणून सरकारने या योजनेच्या जाहीरातीही सुरू केल्या आहेत. पण त्यामुळे जनतेला काय मिळणार आहे ही बाब अधिक महत्त्वाची आहे. या सार्‍या प्रकारावर नजर टाकल्यावर असे जाणवते की, या योजनेबाबत जनतेची फार निराशा होणार आहे कारण ही योजना कच्ची आहे. तिला मंजुरी मिळण्यात काही अडचण नाही कारण त्याला भारतीय जनता पार्टीचा पाठींबा आहे. भारतीय जनता पार्टीने हा पाठींबा देताना बरीच टीका केली. ही अन्न सुरक्षा योजना नसून मत सुरक्षा यंत्रणा आहे असे म्हणत का होईना पण पाठींबा दिला. अर्थात या विधेयकाने केवळ कॉंग्रेसचीच मत सुरक्षा होणार आहे असे नाही तर त्याला पाठींबा दिल्याने भाजपाचीही मतसुरक्षा होणार आहे. या विधेयकामागचा कॉंग्रेसचा आणि भाजपाचा हेतू यात फार मोठे अंतर आहे असे मानण्यात काही अर्थ नाही. या विधेयकाचे समर्थन करताना कॉंग्रेसच्या खासदारांनी शब्दांची काही काटकसर करायचीच नाही असा निर्धार केला होता. गरिबांच्या नावाने टाहो फोडताना त्यांची रसवंती अशीच पाझरत असते. कारण गरीब लोक हेच आपले चालू राजकीय भांडवल आहे आणि गरिबांची गरिबी हे आपले खास शेअर कॅपिटल आहे हे त्यांना चांगले समजते.

गरिबांचा कैवार घेऊन त्यांना सवलती देण्याचा आपला प्रघात कायम राहिला नाही तर आपल्याला खुर्च्या मिळणार नाहीत हे त्यांना चांगले माहीत आहे. म्हणून एका बाजूला गरिबी कायम टिकली पाहिजे असा त्यांचा प्रयत्न असतो. आपला हा गरिबांचा कळवळा त नकली आहे याची त्यांनाच खात्री आहे. तसा तो नसता तर त्यांनी १९७१ साली इंदिरा गांधी यांच्या गरिबी हटावच्या घोषणेची योग्य अंमलबजावणी करीत देशातली गरिबी पूर्ण हटवली असती. त्या घोषणेला आता ४४ वर्षे झाली आहेत. त्यातला काही काळाचा अपवाद वगळता कॉंग्रेसनेच राज्य केले आहे मग गरिबी हटवण्याचा वायदा करून चार तपे झाली आणि गांधी घराण्याच्या तीन पिढ्या सत्तेवर आल्या तरीही या देशात गरीब राहिले कसे आणि त्यांना खायच्या धान्याइतकी मूलभूत गरजही भागवता येऊ नये अशी स्थिती राहिली कशी याची त्यांंना कधी तरी खंत वाटली असती. कॉंग्रेस केवळ गरिबी हटवण्याचे नारे देते. त्याची व्यवस्थित यंत्रणा विकसित करीत नाही, केवळ राजकीय हेतूने गरिबांच्या कल्याणाच्या वल्गना करते, अशी टीका आजवर होत आली.

तिच्यात तथ्य आहे. म्हणूनच अजूनही गरिबी शिल्लक आहे. आजवर या संबंधात करण्यात आलेल्या सार्‍या चुकांसह आता ही अन्न सुरक्षा योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आजवर गरिबी हटवण्याच्या योजनांबाबत जे घडले तेच याही योजनेबाबत घडणार आहे. ही कटू वस्तुस्थिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री के.व्ही. थॉमस यांनी तर मान्य केलीच पण सोनिया गांधी यांनीही मान्य केली. कोणतीही योेजना पैशाविना कशी राबवणार ? या योजनेसाठी पैसा कोठून आणणार ? असा सवाल विरोधी पक्षांनी उपस्थित केला. आपण हा पैसा या मार्गाने उपलब्ध करणार असे नेमके उत्तर कोणीच दिले नाही. सोनिया गांधी यांनी हा पैसा आपण नक्कीच उभा करू असे म्हटले पण नक्कीच म्हणजे कशातून यावर त्यांनी नेमकेपणाने खुलासा तर सोडाच पण एक शब्दही उच्चारला नाही. ही जगातली एक क्रांतिकारक योजना आहे असा त्यांचा दावा आहे. अशी एखादी योजना पृथ्वीच्या पाठीवर कधीच राबवली गेलेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. कितपत सत्य आहे याचा काही खुुलासा करता येत नाही. पण पैशाची सोय न करता भगवान भरोसे राबविली जाणारी जगातली सर्वात मोठी आणि सर्वात पहिली योजना हा मान मात्र तिला नक्कीच मिळेल.

अशी ही आजवरची एकमेव योजना आहेच पण यापुढही जगातले कोणते जबाबदार सरकार अशी योजना राबवणार नाही. इतकी ती खरोखरच क्रांतिकारक आहे. यावर कोणाचाही वाद होणार नाही. अर्थात या क्रांतिकारक पद्धतीने या योजनेची अंमलबजावणी केली जात असल्याने तिच्या अपयशाचीही खात्री ही योजना लागू करतानाच दिली जात आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या कागदावर छान असलेल्या योजना अंमलबजावणीच्या पातळीवर कशा अयशस्वी कराव्यात याबाबत या सरकारचा हात जगात कोणी धरणार नाही. त्यामुळे तर ही योजना प्रत्यक्षात गरिबांच्या पदरांत धान्य टाकणार नाही याची सर्वांनाच शाश्‍वती आहे. या विधेयकावर चर्चा करताना के. व्ही. थॉमस यांनी, तिच्यातले २० ते २५ टक्के धान्य खुल्या बाजारात विकले जाते हे आपल्या तोंडाने मान्य केले आहे. आता ते हे प्रमाण शून्यावर आणणार असल्याचे म्हणत आहेत पण ते कसे करणार याची काहीच योजना त्यांच्याकडे नाही. दक्षता समित्या निर्माण करणे हा एक उपाय आहे असे ते म्हणत असले तरीही दक्षता समिती हा काही नवा उपाय नाही. तो पूर्वीपासूनच लागू आहे. तेव्हा या सरकारने भ्रष्टाचार, गळती, पैशांची कमतरता आणि बेपत्ता यंत्रणा यांच्यासह ही योजना लागू करण्याचा व्यर्थ अट्टाहास केला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी गरिबांच्या कल्याणाचे आणखी एक पाऊल असे या योजनेचे वर्णन केले असले तरी त्यांच्यातला अर्थतज्ञ या योजनेमुळे अस्वस्थ आहे ही बाब तेही लपवू शकलेले नाहीत.

Leave a Comment