रुपया आणि पंतप्रधान दोघेही मुके

राजकोट – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य सातत्याने घसरत असल्याच्या मुद्यावरून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या काही दिवसांत संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) आणि पंतप्रधान यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. एक काळ असा होता, की भारतीय रुपयाचा जगभरात आवाज होता. पण आज रुपयाने हा आवाज गमावला आहे. रुपयाप्रमाणेच, आपल्या पंतप्रधानांचा आवाजही आता ऐकू येत नाही,’ अशा शब्दांत मोदी यांनी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर टीका केली.

गुजरातमध्ये सात नवीन जिल्हे तयार करणार असल्याची घोषणा मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केली होती. त्यामध्ये मोरबी जिल्ह्याचाही समावेश होता. मोरबी हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाबद्दल मोदींचा आज (शनिवार) येथे सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

मोदी म्हणाले की, रुपया आणि पंतप्रधान दोघेही मुके’ झाले आहेत. आज रुपया मृत्युशय्येवर आहे आणि त्यावर तातडीने उपचार करण्याची गरज आहे. सलग दुसर्‍यांदा सत्तेत आल्यानंतर शंभर दिवसांमध्ये महागाई कमी करू, अशा वल्गना यूपीए’ने केल्या होत्या. त्याचे काय झाले ? उलट, आता रुपया आणि यूपीए’ दोघांचेही मूल्य खालावलेले आहे. देशाला उध्वस्त होण्यापासून वाचविण्याची वेळ आता आली आहे. देशाची अशी अवस्था का झाली, हे केंद्र सरकारने जनतेला सांगायला हवे. पण सरकार याबाबतीत जनतेची दिशाभूल करत आहे, असेही मोदी यांनी सांगितले. यावेळी मोदींची चांदीमध्ये तुला करण्यात आली. नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचे एकता स्मारक’ उभारले जाणार आहे. त्या प्रकल्पासाठी मोदींनी तुला केलेली चांदी दान केली.

 

Leave a Comment