नारायण राणें म्हणाले, मोदी थापाड्या

मुंबई – गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात येणार्‍या विकासाच्या दाव्यांची आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी खिल्ली उडवली. एवढेच नव्हे तर, राणेंनी थापाड्या असे मोदींचे नामकरणही करून टाकले.

आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी करण्याच्या उद्देशाने येथे प्रदेश काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत बोलताना राणे यांनी मोदींना लक्ष्य केले. अनेक क्षेत्रांमध्ये गुजरात आघाडीवर असल्याचा मोदींचा दावा त्यांनी यावेळी खोडून काढला. कुठल्याच क्षेत्रात गुजरात महाराष्ट्राच्या पुढे असूच शकत नाही. महाराष्ट्राचे एकूण उत्पन्न (जीडीपी) 12 लाख कोटी रुपये तर गुजरातचे 6 लाख कोटी रुपये असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही मोदींच्या दाव्यातील हवा काढण्याचा प्रयत्न केला होता. गुजराथी जनतेने केलेल्या कार्याचे श्रेय एका व्यक्तीनेच घेणे योग्य नाही, असा शाब्दिक टोला चव्हाण यांनी मोदींना लगावला होता.

दरम्यान, पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये चढाओढ असल्याचे राणे म्हणाले. प्रत्येक निवडणुकीवेळी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांमध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यावरून स्पर्धा सुरू झालेली दिसते. आताही अरुण जेटली, सुषमा स्वराज, मोदी या उमेदवारीसाठी झगडत असल्याचे दिसते.

गोपीनाथ मुंडे यांना पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत विचारले; तर तेही नाही म्हणणार नाहीत, असे राणे या संदर्भात मिस्किलपणे म्हणाले. भाजपमधील अंतर्गत संघर्षाचा फायदा काँग्रेसलाच होईल, असा दावाही त्यांनी केला. मुंबई पालिकेच्या कामकाजावरून त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. शिवसेनेमुळेच मुंबईचे शांघाय बनण्याचे स्वप्न पूर्ण होत नसल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment