श्रीनगर – अमरनाथ गुहेतील मंदिरात आज छडी मुबारकची यात्रा पोहोचली. त्यामुळे यंदाच्या अमरनाथ यात्रेची आज अधिकृत सांगता झाली. महंत दीपेंद्र गिरी यांनी आज मंदिरात विधिवत छडी मुबारकची पूजा करून गेले 55 दिवस सुरू असलेल्या यात्रेची सांगता केली.
अमरनाथ यात्रेची सांगता, छडी मुबारक मंदिरात पोहोचली
सांगता पूजेला राज्यपाल उपस्थित राहण्याची प्रथा आहे; परंतु आज खराब हवामानामुळे राज्यपाल एन. एन. व्होरा तेथे उपस्थित राहू शकले नाहीत. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी या यात्रेचा दरवर्षी समारोप होतो. गेल्या 28 जूनला सुरू झालेल्या या यात्रेत सुमारे साडेतीन लाख लोकांनी अमरनाथचे दर्शन घेतले. यावेळी रजिस्ट्रेशन न केलेल्या भाविकांना यात्रामार्गावर जाऊ देण्यात आले नाही. त्यामुळे यंदा तुलनेने कमी भाविक येथे दर्शन घेऊ शकले.
तेरा वर्षांखालील आणि 75 वर्षांवरील भाविकांना येथे येण्यास मनाई करण्यात आली आहे आणि या अटीचे यंदा काटेकोर पालन करण्यात आले. यंदाच्या यात्राकाळात एकूण 14 भाविकांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाला. गेल्या दहा वर्षांतील हे, सर्वांत कमी प्रमाण आहे.
दरवर्षी येथे खराब हवामान आणि प्रकृतीच्या कारणामुळे मोठ्या प्रमाणात भाविक दगावतात. या भाविकांच्या सोयीसाठी पहलगाम आणि बालताल मार्गावर सरकारने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली असली तरी ती फारशी परिणामकारक ठरत नाही. पंजाब आणि उत्तर भारतातील विविध धार्मिक संघटना आणि संस्था यात्रेकरूंसाठी ठिकठिकाणी लंगरची व्यवस्था करतात त्यामुळे भाविकांची चांगली सोय येथे होत असते.
