पक्षावर निष्ठा ठेवून कर्तृत्वाने नेतृत्व सिद्ध करा – राणे

मुंबई – कार्य आणि कर्तृत्वाला स्त्री- पुरुष असा भेदभाव नसतो. स्वर्गीय इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, बंदरनायके या महिला नेत्यांनी अफाट कर्तृत्वाच्या बळावर आपल्या कार्याचा ठसा जगाच्या नकाशावर उमटविला. त्यांचा आदर्श ठेवून पक्षासाठी झपाटून कार्य करून आपले नेतृत्व सिद्ध करा. कर्तृत्ववान माणसाला कुणी डावलू शकत नाही, अशा शब्दांत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी महिला काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांचा आत्मविश्वास जागृत केला.

महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या वतीने महिला पदाधिकार्‍यांसाठी लोणावळा येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. त्याच्या समारोपप्रसंगी महिला कार्यकर्त्यांचे मनोबल उंचावणारे मार्गदर्शन राणे यांनी केले. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य चारू टोकस व्यासपीठावर होत्या.
पुरुष आणि स्त्री असा भेदभाव मी करत नाही. स्वर्गीय राजीव गांधी म्हणत, दोन्ही पंखांत बळ असेल तरच पक्षी आकाशात उंच झेप घेतो. स्त्री आणि पुरुष हे दोन पंख आहेत. दोघांनी सारखेच कर्तृत्व गाजविले तर देशाची नक्कीच उन्नती होईल. स्त्रियांमध्ये गुणवत्ता असतेच. आपल्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, लोकसभेच्या अध्यक्षा मीरा कुमार, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज या सर्व महिला आहेत. अनेक राज्यांच्या मुख्यमंत्रीही महिला आहेत. कोणत्या आरक्षणामुळे त्यांना ही पदे मिळाली नाहीत, तर आपल्या कर्तृत्वाने त्यांनी ती पदे काबीज केली आहेत. असे ते म्हणाले.

केंद्र आणि राज्य सरकारने महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. त्या योजनांचा लाभ तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचून त्यांचे सबलीकरण करण्यासाठी प्रयत्न करा. हा विचार गावागावात पोहोचवून काँग्रेसला मजबूत करा, असे आवाहन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.

Leave a Comment