राम मंदिरासाठी मुलायमसिंगांना साकडे

लखनौ – १९९१ साली अयोध्येच्या राम मंदिराची कारसेवा करण्यासाठी आलेल्या कारसेवकांवर गोळीबार करून हिंदुत्ववादी संघटनांच्या रोषास कारणीभूत ठरलेले समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंग यादव यांनाच हिंदुत्ववादी संघटनांनी राम मंदिराच्या बाबतीत साकडे घातले आहे. राम मंदिराच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकारणाला नाट्यमय वळण देत विश्‍व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी मुलायमसिंग यादव यांची भेट घेतली आणि त्यांनी राम मंदिराच्या बांधकामाबाबत मुस्लीम धर्मगुरुंची मने वळवावीत असे त्यांना आवाहन केले.

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांच्या शासकीय निवासस्थानी अशोक सिंघल आणि मुलायमसिंग यादव यांच्यात दीड तास चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्री अखिलेश यादव हेही उपस्थित होते. अशोक सिंघल यांच्या सोबत यावेळी काही संतही आलेले होते. ही भेट संपवून ते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आले तेव्हा पत्रकारांनी त्यांची भेट घेतली आणि चर्चेबाबत काही प्रश्‍न विचारले. तेव्हा अशोक सिंघल यांनी, या चर्चेतला मुलायमसिंग यादव यांचा प्रतिसाद सकारात्मक होता असे सांगितले.

विश्‍व हिंदू परिषदेने केंद्र सरकारला राम मंदिराबाबत इशारा दिलेला आहे. केंद्राने येत्या १८ ऑक्टोबरपर्यंत राम मंदिराच्या बांधकामाला अनुमती देणारे विधेयक संसदेत मंजूर करावे, अन्यथा १८ ऑक्टोबरपासून विहिंप देशव्यापी आंदोलन करील असे या संघटनेच्या नेत्यांनी सरकारला बजावले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर होत असलेल्या या राजकीय हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर अशोक सिंघल यांची मुलायमसिंग यादव यांच्याशी झालेली भेट महत्वाची समजली जात आहे.

Leave a Comment