न्यूयॉर्क: न्यूयॉर्कच्या स्वातंत्र्यदिन संचलनाच्या रविवारी होत असलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज सहभागी होत आहेत. लोकपाल विधेयकासाठी अण्णांनी दिलेला लढा जगभरात गाजला. त्यामुळेच या दौ-याकडेही जगभरातील माध्यमांचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेत होणा-या विविध कार्यक्रमांसाठी अण्णा १५ ऑगस्टला रवाना झाले आहेत.
काही दिवसांपूर्वीच अण्णांना अमेरिकेकडून विशेष आमंत्रण देण्यात आले होते. विविध कार्यक्रमांबरोबरच जगातील दुस-या मोठ्या शेअर बाजाराची अर्थात नॅसडॅकची सुरूवात त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यासोबतच वॉशिंग्टन, सॅन फ्रान्सिस्को, अटलांटा, साऊथ कॅरोलिना या प्रांतांचा दौरा करुन अण्णा तिथल्या भारतीयांशी संवाद साधणार आहेत.
अमेरिकेतील सँडफोर्ड आणि पेनिनसिल्विया या दोन विद्यापीठांमध्ये अण्णांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय सीएनएन, न्यूयॉर्क टाईम्स आणि टाईम मॅगेझिनने अण्णांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यामुळे एकंदरीत हा दौरा अण्णासाठी महत्वपूर्ण मानला जात आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.