निर्दोष असल्याचा दुर्गाशक्तीचा दावा

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातल्या सनदी अधिकारी दुर्गाशक्ती नागपाल यांनी सरकारने त्यांच्यावर लावलेल्या आरोपाना उत्तर दिले असून आपण निर्दोष असल्याचे म्हटले आहे. राज्य शासनाने त्यांना निलंबनाची नोटीस पाठवून त्यांना पंधरा दिवसांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते. त्यानुसार नागपाल यांनी नोटिसीला उत्तर दिले आहे. मशिदीची भिंत पाडण्याचे काम आपण सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारे केले आहे, ते करण्याआधी आपण गावकर्‍यांची बैठक घेतली होती आणि त्यांच्याशी चर्चा करूनच आपण हे पाडकाम केले असा खुलासा त्यांनी केला आहे.

राज्य सरकारचे आरोपपत्र १० पानांचे असून ते मीरत विभागाच्या विभागीय आयुक्तांच्या अहवालाच्या आधारे देण्यात आले असल्याचे त्यात म्हटले आहे. नागपाल यांनी ती भिंत पाडताना नागपाल यांनी नियम पाळले नसल्याचाही ठपका त्यात ठेवण्यात आला आहे. या गावात तणाव नसला तरीही ते पाडकाम करताना दुर्गाशक्ती या त्या गावात गेल्या त्याने तणाव वाढला असेही या आरोपपत्रात म्हटले आहे. या प्रकरणाला राजकीय रंग चढला आहे. सोनिया गांधी यांनी त्यात लक्ष घातल्याने तर हे प्रकरण बरेच वादग्रस्त झाले आहे. नागपाल यांना निलंबित करण्याचा आदेश निघाला त्यावर सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून लक्ष घालण्याची सूचना केली होती.

सोनिया गांधी या प्रकरणात उतरल्या त्याच्या दुसरे दिवशी राज्य सरकारने दुर्गाशक्ती नागपाल यांच्यावर आरोपपत्र ठेवले आणि त्यांच्याकडून खुलासा मागितला. त्यांचा खुलासा आल्यानंतरच त्यांच्या निलंबनाची कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्री अखिलेशसिंग यादव यांनी म्हटले होते. आता दुर्गाशक्ती यांचा खुलासा आला आहे. सरकारने त्यांच्यावर मशिदीची भिंत पाडल्याचा आरोप केला आहे पण प्रत्यक्षात त्यांनी वाळू माफियांना वेसन घातली म्हणून ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता पण दुर्गाशक्ती नागपाल यांच्या खुलाशात वाळू माफियांचा थोडासाही उल्लेख नाही.

Leave a Comment