चाणाक्ष चाल की सवंगपणा?

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे कल्पकतेने प्रचार करणार असे दिसत आहे आणि त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांना अस्वस्थ करणार्‍या चाणाक्ष खेळी खेळायला सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये त्यांच्या भाषणाला पाच रुपये तिकीट लावण्यात आले ही युक्ती सुद्धा कल्पकतेची ठरली. परंतु अशा प्रकारची युक्ती करण्याच्या नादात काल त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याला आणि पावित्र्याला गालबोट लावले. त्यांनी नेहमीच्या प्रथेला फाटा देऊन गांधीनगरच्या ऐवजी भूज येथे स्वातंत्र्य दिनाचा राज्य सरकारचा कार्यक्रम साजरा केला आणि तिथे मोठा औचित्यभंग करून भाषण केले. स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय कार्यक्रम असतो. परंतु या राष्ट्रीय कार्यक्रमाला मोदी यांनी पक्षीय स्वरूप दिले. मुख्यमंत्री म्हणून आपण गुजरातची प्रगती होण्यासाठी काय केले आणि काय करणार आहोत याचा गांभीर्याने आढावा घेण्याऐवजी त्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या भाषणाला लक्ष्य करून त्यांच्यापेक्षा आपण कसे छान भाषण करू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर सवंगपणाचा शिक्का बसला आहे.

अशा प्रकारची विरोधी सभा घेण्याची मोदींची कल्पना काही लोकांना आवडूनही गेली असेल, परंतु त्यांनी या सभेमध्ये निदान भाषणाचा दर्जा तरी टिकवायला हवा होता. स्वातंत्र्याची उद्दिष्ट्ये, स्वातंत्र्याचे रक्षण, घटनेचे पावित्र्य अशा तात्विक मुद्यांचा उल्लेख त्यांनी केला असता तर त्यांचे भाषण वैचारिकदृष्ट्या तरी वरच्या दर्जाचे ठरले असते. परंतु त्यांनी हा मोका गमावला आणि या सभेला पक्षीय राजकारणातल्या सभेचे स्वरूप दिले. मनमोहनसिंग हे भारताचे सर्वात वाईट पंतप्रधान आहेत असे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. त्यांचे हे म्हणणे आपण मान्यही करू. परंतु ते ‘पंतप्रधान’ आहेत ही गोष्ट खरी आहे. ते जनतेचे नेते आहेत आणि त्या पदाची प्रतिष्ठा सर्वांनीच सांभाळली पाहिजे, विशेषत: ज्याच्या मनामध्ये पंतप्रधान होण्याची महत्वाकांक्षा आहे अशा मोदींनी तरी तशी ती सांभाळायला हवी होती. मनमोहनसिंग हे चांगले वक्ते नाहीत, ते निरस भाषण करतात. परंतु हे सांगण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाचा मोका साधावा हा औचित्यभंग आहे.

काल नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये भूज येथे सरकारी कार्यक्रमात ध्वजवंदन करताना पंतप्रधानांच्या भाषणाची टर उडवली. आपल्या या भाषणाच्या आधी मनमोहनसिंग यांच्यापेक्षा आपले भाषण छान होणार आहे, अशी आगाऊ जाहिरात सुद्धा केली. परंतु एरवी पक्षीय राजकारणाला शोभणारा हा सवंगपणा स्वातंत्र्यदिनाचे पावित्र्य गमावून बसला. नरेंद्र मोदी यांना बर्‍या किंवा वाईट पद्धतीने सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची कला अवगत झालेली आहे. त्यामुळे ते माध्यमांचा विषय झालेले असतात. लोक त्यांच्यावर टीका करतील पण त्या निमित्ताने का होईना ते प्रसिद्धीच्या झोतात राहतात. परंतु काल स्वातंत्र्य दिनाचे भाषण देण्याचा मोका असा प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्यांनी वापरला ही त्याची चाल कदाचित त्यांना प्रसिद्धीच्या झोतात ठेवूनही गेली असेल, पण त्यांच्या समर्थकांच्या मनात सुद्धा त्यांच्याविषयीचा आदर कमी करून गेली आहे. स्वातंत्र्य दिनाचे कार्यक्रम हे पक्षीय राजकारण खेळण्याचे ठिकाण नाही, असे जनतेलाही वाटते. भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांना सुद्धा तसेच वाटते. मात्र मोदींना ही भावना कळली नाही. लालकृष्ण अडवाणी हे भाजपाचेच ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनीही नरेंद्र मोदी यांच्या या भाषणाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि ती योग्य आहे. भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने सुद्धा मोदी यांची निर्भत्सना केली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला पंतप्रधान पक्षीय हिताच्या दृष्टीने वापरत नाहीत. ते सरकारचे कार्यक्रम आणि जनतेच्या हितासाठी घेतलेले निर्णय याचा आढावा घेत असतात. भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून बोलतात तेव्हा सारे जग ते ऐकत असते. मुळातच आपले पंतप्रधान चांगले वक्ते नाहीत आणि त्यातच कार्यक्रम सरकारी स्वरूपाचा असतो. त्यामुळे राजकीय फड गाजवणार्‍या भाषणाप्रमाणे हे भाषण रंजक नसते, तडाखेबाजही असण्याची शक्यता कमीच असते. अटलबिहारी वाजपेयी हे तर एवढे गाजलेले वक्ते आहेत, परंतु पंतप्रधान म्हणून लाल किल्ल्यावरून बोलताना त्यांचेही भाषण निरसच होत होते. तेव्हा मनमोहनसिंग यांचे भाषण निरस झाले म्हणून त्यावर टीका करणारे भाषण मोदी यांनी लगेच द्यावे आणि स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला राजकीय जुगलबंदीचे स्वरूप आणावे ही गोष्ट चुकीची ठरलेली आहे. मोदींना संयम पाळता आला नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनाचे गांभीर्य कमी झाले. सांगून सांगून मोदींनी सांगितले तरी काय? त्यांनी भारताच्या प्रगतीची आकडेवारी समोर ठेवली आणि आपण गुजरातमध्ये किती प्रगती केली आहे याचे आकडे समोर ठेवले. यात नवीन काय होते? अशी आकडेवारी तर ते बर्‍याच दिवसांपासून ठेवत आले आहेत आणि पुढेही ठेवू शकले असते.

मनमोहनसिंग यांनी नरेंद्र मोदी यांना उत्तर द्यायचे ठरवले असते तर ते सहजपणे असे म्हणू शकले असते की, मोदी यांनी गुजरातमध्ये एवढी प्रगती केली खरी, पण ती प्रगती करण्यासाठी मुक्त अर्थव्यवस्थाच त्यांच्या मदतीला धावून आलेली आहे आणि १९९१ साली मनमोहनसिंग यांनीच ती अर्थव्यवस्था राबवलेली आहे. तशी त्यांनी ती राबवली नसती आणि अर्थमंत्री म्हणून केलेली कामगिरी दाखवली नसती तर मोदी यांना गुजरातमध्ये परदेशी भांडवल कसे आणता आले असते? खरे म्हणजे ज्या काळात मनमोहनसिंग ही खुली अर्थव्यवस्था राबवत होते त्या काळात भाजपा आणि संघ परिवारातले सगळे स्वदेशीवादी नेते खुल्या अर्थव्यवस्थेवर टीकेची झोड उठवत होते. मनमोहनसिंग यांची खुली अर्थव्यवस्था म्हणजे देशात पुन्हा परकीयांचे राज्य आणणे आहे, असे संघ परिवारातले नेते एक मुखाने म्हणत होते. पण आपण टीका केलेल्या याच अर्थव्यवस्थेचे लाभ घेऊन मोदी यांनी गुजरातमध्ये प्रगती केली असेल तर त्या प्रगतीचे बरेचसे श्रेय मोदींपेक्षा मनमोहनसिंग यांनाच दिले पाहिजे. मात्र मनमोहनसिंग हे बोलणार नाहीत, निदान काल तरी बोलले नसते. कारण त्यांना स्वातंत्र्यदिनाचे गांभीर्य कळते, जे मोदींना कळत नाही.

Leave a Comment