बिजींग – इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर घर असणा-या व्यक्तींचा इमारतीच्या गच्चीवर अघोषित अधिकार असतो. पण त्याचा वाटेल तसा वापर करणारेही कमी नसतात. त्याचा प्रत्यय आपल्याला नेहमीच येतो. परंतु चीनमधील एका अवलियाने आपल्या या अघोषित अधिकाराचा केलेला गैरवापर थक्क करणारा आहे. या अवलियाने इमारतीच्या गच्चीवर चक्क एक अनधिकृत डोंगरच तयार केला होता आणि त्यामध्ये निसर्गरम्य वातावरणात स्वत:चे घर तयार केले होते. मात्र, हे घर इमारतीसाठी धोकादायक ठरू लागल्यावर ते पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
प्राध्यापक असलेल्या झांग लिन याने तो राहत असलेल्या 26 मजली इमारतीच्या गच्चीवरील एक हजार स्क्वेअर फुटामध्ये हा व्हिला उभारला आहे. हा व्हिला उभारण्यासाठी झांगला तब्बल सहा वर्षे लागली. या सहा वर्षामध्ये इमारतीवर अनधिकृत व्हिला उभारताना शेजा-यांनी बराच विरोध केला. पण झांग हा कायदेमंडळाच्या सल्लागार समितीचा माजी सदस्य असल्याने त्यांचे काहीही चालेना.
पण व्हिलाच्या बांधकामादरम्यान इमारतीच्या छताला तडे गेल्याने लोकांच्या घरात छतातून पाणी गळणे, गॅस गळती असे त्रास लोकांना होऊ लागला. त्यामुळे झांगच्या शेजा-यांनी यासंदर्भात पोलिसांकडेही तक्रार केली. पण त्याचाही परिणाम झाला नाही. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या शेजा-यांनी यासंदर्भातील माहिती वृत्तपत्र व मायक्रोब्लॉगस्वर टाकल्याने त्याकडे सा-यांचे लक्ष वेधले गेले. त्यामुळे बीजिंगमध्ये हा व्हिला चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, हा व्हिला बांधण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याने चिनी प्रशासनाने हा व्हिला 15 दिवसात तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच हा आकर्षक असा व्हिला नेस्तनाबूत होणार आहे.