
ब्राझिलीया – ब्राझील हा दक्षिण अमेरिकेतील अमेरिकेचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार असणारा देश आहे. इंटरनेटच्या माध्यमातून गुप्तपणे माहिती गोळा करणाऱ्या अमेरिकेच्या कार्यक्रमाविषयी ब्राझीलने उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिले जाईल,अशी भूमिका अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी यांनी आज (बुधवार) स्पष्ट केली. केरी हे सध्या ब्राझील दौर्या्वर आहेत. मात्र, या हेरगिरीच्या कार्यक्रमात बदल करण्याचे कोणतेही संकेत केरी यांनी दिले नाहीत. ब्राझील व लॅटिन अमेरिकेतील इतर देशांची माहितीही अमेरिका गुप्त पद्धतीने मिळवित असल्याचे उघडकीस आल्यानंतर ब्राझीलने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत अमेरिकेडून जेट लढाऊ विमाने घेण्याचा विचार रद्द केल्याचे संकेत मिळत होते. या पार्श्वभूमीवर केरी याचा ब्राझील दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. अमेरिकेच्या हेरगिरी कार्यक्रमाची माहिती उघड झाली असली तरी याचा परिणाम दोन्ही देशांमधील व्यापार, राजनैतिक व सांस्कृतिक संबंधावर होऊ नये, असे आवाहन केरी यांनी ब्राझीलला केले आहे.
