प्रियंका करणार स्वत:मध्ये बदल

आपल्या दहा वर्षांपेक्षा जास्तीच्या कारकिर्दीत विविध प्रकारच्या भूमिका साकारणारी बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता स्वत:ला बदलण्याचा विचार करत आहे. बर्‍याच वर्षांपासून आपण एकाच छापाच्या भूमिकांमध्ये गुरफटून गेल्यासारखे तिला वाटत आहे. यातून तिला बाहेर पडण्याची इच्छा असून लवकरच तिचे हे बदललेले रूप पाहण्यास मिळेल. खरेतर प्रियंकाने त्याची सुरुवात आधीच केली आहे. बर्फी असो वा सात खून माफ किंवा लवकरच पूर्ण होत असलेला भारताची ऑलिम्पिक विजेती मुष्टीयोद्धा मेरी कॉमच्या जीवनावरील चित्रपट या सगळय़ांमध्ये तिने वेगळय़ा प्रकारच्या भूमिका देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियंकाने अशा आगळय़ा पठडीतील चित्रपटांमध्ये काम करून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली आहे. मात्र दुसरीकडे ती गंभीर स्वरूपाच्या भूमिकांना वैतागली असल्याचेही जाणवत आहे. त्यामुळेच आता हलक्याफुलक्या भूमिका करण्यावर ती जोर देणार आहे.

अलीकडेच अपूर्व लाखियाच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेल्या जंजीरच्या एका प्रमोशनल गाण्यामध्ये प्रियंकाने धमाल उडवून दिली. या गाण्यात तिने भलतीच हिंमत दाखविली आहे. या गाण्यामध्ये आपल्या हिरोला ती चक्क द्विअर्थी ओळी बोलली असून ते ऐकल्यानंतर कोणताही सुज्ञ प्रेक्षक हैराण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नाही तर तिला या गाण्यातील पोलिसी पोशाखातही ती चांगलीच ग्लॅमरस दिसली आहे. दक्षिणेकडेतील स्टार रामचरण तेजासोबत हे गाणे करणार्‍या प्रियंकाने त्यात धमाल केली आहे. प्रियंकाप्रमाणेच तेजाही पोलिसी पोशाखात आहे. प्रियंकाने त्याच्याबद्दल काढलेल्या द्विअर्थी ओळी नक्कीच अतिशय मजेशीर आहे. अर्थात गाण्याचा मूड पाहून त्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा प्रकारचा चावट खोडकरपणा प्रेक्षकांनाही आवडतो.

Leave a Comment