पवारांची तयारी

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एक मुलाखत एका वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. राज्यात झालेल्या एका जनमत चाचणीमध्ये येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ तीन जागा मिळतील असा निष्कर्ष निघाला आहे. त्या संदर्भात ही मुलाखत होती. याबाबतच्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना अजित पवार यांनी, आम्ही काही दुधखुळे नाही, केवळ तीन जागा मिळणार असतील तर ते चित्र बदलण्याचा प्रयत्न आम्ही करणारच असा निर्धार व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसला केवळ तीनच जागा मिळू शकतात असे चित्र दिसायलासुध्दा लागले आहे. सांगली महानगर पालिकेच्या निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव त्यादृष्टीने मोठा बोलका आहे. या पराभवाचे आणि कॉंग्रेसच्या विजयाचे त्यांच्या पक्षीय पातळीवर बरेच विश्‍लेषण झाले आहे आणि पक्षाच्या पराभवाला नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भाजपाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांची उमेदवारी पुढे आली तरी राष्ट्रीय पातळीवर मुस्लीम समाजाला कॉंग्रेस पक्षच आपल्या जवळचा वाटणार आहे आणि तसा तो वाटतो म्हणून सांगलीत मुस्लीम समाजाने कॉंग्रेसला मतदान केले. परिणामी कॉंग्रेसचा विजय आणि राष्ट्रवादीचा पराभव झाला.

या निष्कर्षाच्या पार्श्‍वभूमीवर शरद पवार यांनी जनमत चाचणीचा निष्कर्ष खोटा पाडण्यासाठी आपणही मुस्लिमांचा अनुनय केला पाहिजे असा निर्णय घेतला असेल तर तो फारसा नवलाचा नाही. कारण शेवटी शरद पवार हेही कॉंग्रेस संस्कृतीचेच पाईक आहेत आणि या अनुनयाचा एक भाग म्हणून पवारांनी मुस्लीम समाजाच्या विषयी प्रेम व्यक्त करण्याकरिता अगदी टोक गाठले. मालेगावच्या स्फोटाच्या संदर्भात १९ मुस्लीम तरुणांना तीन वर्षे विनाकारण तुरुंगात रहावे लागले अशा अन्यायामुळे चिडून या मुलांनी देशद्रोही कारवायांना मदत केली तर त्यात त्यांची काही चूक नाही, त्यांना दोष देता येणार नाही असे प्रतिपादन करून पवारांनी मुस्लिमांच्या मतांसाठी पदर पसरला आहे. एवढेच करून ते थांबलेले नाहीत. मुस्लीम तरुणांच्या देशद्रोही कारवायांचे असे समर्थन केल्यामुळे समाजातल्या काही लोकांची मते आपल्यापासून दूर जातील मात्र तसे झाले तरी आपल्याला काही पर्वा नाही असे म्हणून त्यांनी आपण मुस्लिमांचे किती समर्थक आहोत हे दाखवून दिले. अर्थात पवारांना समाजातल्या अन्य घटकांची मते नको आहेत असे नाही. ती त्यांना हवीच आहेत. म्हणून पवारांनी याच वेळी त्यांचीही सोय करून ठेवली आहे.

दलितांचे आरक्षण तर योग्यच आहे. मराठा समाजालाही आरक्षण मिळालेच पाहिजे मात्र ते देताना अन्य कोणतेही समाज घटक नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. एवढेच नव्हे तर सवर्णातील गरीब मुलांसाठी आरक्षणाच्या सवलती दिल्या पाहिजेत असे आरक्षणाचेही राजकारण करून पवारांनी ब्राह्मण, मराठा, दलित, ओबीसी अशा सर्व जातींना खुष करून टाकले आहे. राज्यामध्ये जनमत चाचणीत केवळ तीन जागा मिळणार असा निष्कर्ष निघाला असूनही आम्ही गप्प बसू एवढे आम्ही दुधखुळे नाही हे अजित पवार यांचे म्हणणे बरोबरच आहे. शरद पवारांनी तयारी सुरू केली आहे. मुस्लीम समाज त्यांच्यावर नाराज आहे. कारण मालेगावच्या १९ तरुणांना तीन वर्षे तुरुंगात जाऊन रहावे लागले ते शरद पवारांच्या सरकारमुळेच रहावे लागले आहे. त्यांना महाराष्ट्राच्या गृहखात्यानेच अटक केली होती. म्हणजे त्या मुलांचा खरा रोष शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि आर. आर. पाटील यांच्यावरच आहे. परंतु पवारांनी हा विषय अशा काही कौशल्याने टोलवला आहे की या अन्याय्य अटकेला त्यांचा पक्ष जबाबदार नाही असेच सर्वांना वाटावे. म्हणून या संबंधात बोलताना श्री. शरद पवार यांनी या तरुणांच्या कारावासाला व्यवस्था जबाबदार असल्याचे म्हटले आहे आणि आपल्यावर येणारी एक जबाबदारी व्यवस्था नावाच्या अमूर्त कल्पनेवर टाकून ते मोकळे झाले आहेत.

मालेगावचे मुस्लीम तरुण तीन वर्षे तुरुंगात पडले पण असे तुरुंगात पडण्याची वेळ केवळ मालेगावच्या तरुणांवरच आलेली आहे असे काही नाही. अनेक आदिवासी तरुण आणि विनाकारण तुरुंगात डांबले गेलेले आहेत. कोणाला तरी विनाकारण तुरंगात रहावे लागणे हा प्रकार काही आजचा नाही. उलट पवारांचे सरकार टाडा सारखे कायदे करून कैक जणांना फारसे पुरावे नसताना तुरुंगात ठेवण्याची सोय करत आहे. अशा प्रकारचा टाडा हा कायदा पवारांच्याच सरकारने केला होता. पण अशी या तुरुंगवासाची प्रत्यक्ष जबाबदारी आपल्यावर असतानाही पवार मोठ्या गांभिर्याचा आव आणून व्यवस्था बदलली पाहिजे असे म्हणतात. ते शुध्द ढोंग आहे. शेवटी सिस्टिम किंवा व्यवस्था म्हणजे तरी काय असते? व्यवस्था ही अनेक घटकांनी बनलेली असते. तिच्यात धार्मिक परंपरा, समाजरचना, राज्यपध्दती, आर्थिक हितसंबंध असे अनेक घटक गुंतलेले असतात आणि अशी व्यवस्था बदलणे मोठे अवघड असते पण मालेगावच्या तरुणांना झालेल्या शिक्षेला अशी कोणतीही गुंतागुंतीची व्यवस्था कारणीभूत नाही तर राज्य सरकारचे गृहखाते कारणीभूत आहे. मात्र ही गोष्ट झाकून ठेवून त्यांची मते मिळावीत म्हणून पवार व्यवस्थेचा बाऊ उभा करत आहेत आणि तिच्या कथित दोषामुळे काही तरुणांनी देशद्रोह केला तरी चालेल अशी टोकाची भूमिका घेत आहेत.

Leave a Comment