पाकच्या हल्ल्यात बीएसएफ जवान जखमी

जम्मू – पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचा भंग करत जम्मूतील अल्फा माचेल पोस्ट येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) रविवारी सकाळच्या सुमारास गोळीबार केला. यात बीएसएफचा एक जवान जखमी झाला आहे. पाकिस्तान सैन्याकडून गेल्या आठवडाभरात भारतीय चौकीवर करण्यात आलेला हा तिसरा हल्ला
आहे.

पाच दिवसांपूर्वीच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून भारतात घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात भारतीय सैन्याचे 5 जवान ठार झाले होते. त्यांनतर शुक्रवारी रात्री पूँछ जिल्ह्यातील पाकिस्तानी सैन्याने भारतीय लष्करी ठाण्यांवर तुफान गोळीबार केला होता. याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

रविवारी सकाळी सातच्या सुमारास पुन्हा पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करीत भारतीय सैन्यावर हल्ला चढविला. यावेळी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात बीएसएफचा पवन कुमार हा जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.