बोल्ड पूनम पांडे आता दाखविणार देसी रूप

आपली बेताल वक्तव्ये व अंगावरील कपडे उतरविण्याचा सतत काहीतरी बहाणा शोधून काढणारी चर्चित अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडेने बहुधा स्वत:ला बदलविण्याचा निर्णय घेतला आहे. ‘बिकिनी गर्ल’ अशी आपली ओळख निर्माण करणारी पूनम आगामी चित्रपटात चक्क देशी गर्ल अवतारात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी पडद्यावर आलेल्या नशा या आपल्या पहिल्याच चित्रपटात तिने अतिशय भडक भूमिका साकारली होती, पण मोठा गाजावाजा होऊनही नशाने प्रेक्षकांना जराही झिंग आणली नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. म्हणूनच बहुधा पूनमने आपली प्रतिमा बदलून घेण्याचे ठरविले आहे.

एका आगामी चित्रपटात तिला गावरान गोरीच्या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली आहे व तिनेही त्यास अनुकूलता दर्शविली आहे. स्मिता पाटील आणि झिनत अमान यांची मोठी चाहती असलेली पूनम सांगते की, या दोन्ही अभिनेत्री माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. साडीमध्ये त्या दोघी नेहमीच अतिशय सुंदर दिसल्या आहेत. खरे भारतीय सौंदर्य त्यांनी अतिशय प्रभावीपणे पडद्यावर दाखविले आहे.

पुढच्या चित्रपटात मी देखील अशाच प्रकारचे पात्र साकारणार आहे आणि तशी संधी चालून आल्याने अतिशय खूश आहे. या चित्रपटात पटकथाकार अजित रामपाल यानेही पूनमला नजरेसमोर ठेवूनच कथा लिहिली आहे. तो सांगतो की, पूनमशी यासंबंधी चर्चा झाली तेव्हाच तिच्यातील प्लस पॉइंट्स त्याच्या लक्षात आले. ही भूमिका नक्कीच तिला आपली बोल्ड व बिनधास्त ही प्रतिमा बदलण्यास हातभार लावेल. एवढेच तिला वेगळा लूकही देऊन जाईल. पूनमने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बोल्ड भूमिकेद्वारे केली, पण तिचा हा प्रयत्न फुसका बार ठरला. त्यामुळेच फक्त बोल्ड दृश्ये देऊन काहीच साध्य होणार नाही, हे बहुधा तिला उमगले आहे. कदाचित असेही होईल की, तिच्या चाहत्यांना तिचे हे देशी रूपच आवडून जाईल.

Leave a Comment