मेडिकल माफिया

गुजरातेत सरोगेट मदरहूड ही वैद्यकीय प्रॅक्टिस मोठ्या प्रमाणावर केली जाते. अपत्य न होणार्‍या दांपत्यांना ते एक वरदानच लाभलेले आहे. त्यामुळे अशा प्रयोगातून ज्या डॉक्टरांमुळे मातृत्व किंवा पितृत्व मिळते त्या डॉक्टरला अशी विनापत्य दांपत्ये अक्षरशः देवदूत मानतात. परंतु या देवदूतांना आता गैरप्रकार करून पैसे कमावण्याची अवदसा आठवली आहेे आणि त्यांनी याही क्षेत्रात अधिक पैसा कमवण्यासाठी सरोगट मदरहूडच्या बहाण्याने मुलांच्या विक्रीचे रॅकेट चालवायला सुरूवात केली आहे. अशा डॉक्टरांकडे पाहिल्यानंतर त्यांच्यासाठी मेडिकल माफिया असा शब्द वापरल्याशिवाय राहवत नाही. गेल्या काही दिवसांपासून वैद्यकीय व्यवसायातल्या गैर प्रकारांना मोठ्या प्रमाणावर तोंड फुटले आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात ग्रामीण भागातल्या अनेक महिलांची गर्भाशये काढून टाकल्याचे आढळले आहे. साध्या साध्या आजाराचे निमित्त होऊन डॉक्टरकडे आलेल्या रुग्ण महिलांना डॉक्टर मंडळी गरज नसताना गर्भाशय काढून टाकण्याची शिफारस करतात. तिला गर्भाशयाचा कर्करोग झाला आहे असे सांगितले जाते आणि हा कर्क रोग पसरण्याच्या आधी गर्भाशयच काढून टाकले तर कर्करोगाची शक्यता राहणार नाही असे सांगून गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया केली जाते.

या पैकी काही महिलांना मुले असतात तेव्हा त्यांना आणखी मुले नको असतात मग गर्भाशय काढून टाकल्याने काही नुकसान होणार नसते. त्यामुळे त्या गर्भाशय काढण्यास राजी होतात. मात्र त्यानंतर त्या अनेक विकारांना तोंड देत अक्षरशः विकलांग जीवन जगतात. मात्र गर्भाशय काढून टाकण्याची अनावश्यक शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर प्रत्येक शस्त्रक्रियेपोटी १५ ते २० हजार रुपये कमावून मजेत जगत राहतो. एका इंग्रजी साप्ताहिकाने या प्रवृत्तीचा पाठपुरावा केला तेव्हा असे आढळले की या शेकडो महिलांच्या अस्तित्वात नसलेल्या कर्करोगाचा बाऊ करून केलेल्या शस्त्रकिया करण्याआधी एकाही महिलेची कर्करोगासाठी आवश्यक असलेली बायोप्सी केलेली नव्हती. अशा प्रकारची प्रवृत्ती भु्रण हत्येच्या बाबतीत तर मोठ्या प्रमाणावर दिसून आलेली आहेच. डॉक्टर मंडळी सगळ्याच क्षेत्रामध्ये आता काळा बाजार करायला लागली आहेत. डॉक्टरांना एकेकाळी देवदूत म्हटले जात असे. कारण ते वेदनेचा नाश करत असतात. परंतु पैशाच्या लोभापोटी आता डॉक्टरमंडळी लोकांच्या शारीरिक वेदनांचा नाश करत करता त्यांना मानसिक वेदनांनी जर्जर करून टाकायला लागले आहे.

वैद्यकीय व्यवसायात सध्या सुरू असलेला सर्वात मोठा आणि उजळ माथ्याने सुरू असलेला गैरप्रकार म्हणजे कट प्रॅक्टिस. या गैरप्रकाराविरुध्द रायगड जिल्ह्यातल्या डॉ. एच.एस.बावसकर यांनी आवाज उठवला आहे. काही डॉक्टर रुग्णांना आवश्यक किंवा अनावश्यक चाचण्या करायला लावतात. एखाद्या डॉक्टरच्या शिफारशीवरून एखादा पेशंट अशी चाचणी करायला जातो. तेव्हा त्याच्याकडून त्या चाचण्यांपोटी मोठी रक्कम घेतली जाते आणि चाचणीचा सल्ला देणार्‍या डॉक्टरला त्या सल्ल्याबद्दल काही कमीशन दिले जाते. अशा प्रकारची कट प्रॅक्टिस सर्रासपणे सुरू आहे आणि त्यामुळे डॉक्टरांची फी महागली आहे. एखाद्या डॉक्टरकडे आलेल्या पेशंटकडून डॉक्टरने किती फी घेतली पाहिजे यावर कायद्याचे कसलेही बंधन नाही. म्हणून डॉक्टर भरमसाठ फी आकारतात. या फीच्या आकारणीमध्ये कट प्रॅक्टिस म्हणून अन्य डॉक्टरला द्यावयाच्या रकमेचाही समावेश असतो. म्हणजे एखादा डॉक्टर जी फी आकारतो त्या फीचा किमान २० टक्के आणि कमाल ४० टक्के हिस्सा अन्य कोणा डॉक्टरला किंवा डायग्नॉस्टिक सेंटरला कट प्रॅक्टिस म्हणून देण्यासाठी असतो. म्हणजे डॉक्टर मंडळी एकमेकांना पेशंट मिळवून देतात आणि त्याबद्दलचा मोबदला पेशंटच्या खिशातून काढून एकमेकांना देतात.

त्यामुळे सध्या डॉक्टरांच्या फीच्या रकमा प्रचंड वाढल्या आहेत. गरीब माणूस तर या डॉक्टरांच्या हडेलहप्पीमुळे हतबल होऊन जातो. वैद्यकीय व्यवसाय तीन घटकांवर चालतो. डॉक्टर, डायग्नॉस्टिक सेंटर आणि औषध निर्माते या तिघांनीही आपापले व्यवसाय वाढविण्यासाठी परस्परांना कट प्रॅक्टिसच्या माध्यमातून पैसे देण्यास सुरूवात केली आहे. हा पैसा रुग्णांकडून वसूल केला जातो आणि त्यासाठी रुग्णांना जेवढे लुटता येईल तेवढे लुटले जाते. या भ्रष्टाचारामुळे डॉक्टरांची फी तर महागली आहेच पण डॉक्टरांच्या या हावरेपणामुळे आणि औषध कंपन्यांमुळे औषधेसुध्दा महाग झाली आहेत. याचे कारण असे की एखादे औषध विकले जाणे हे डॉक्टरने चिठ्ठीत ते औषधाचे नाव लिहिण्यावर अवलंबून असते. डॉक्टरची मर्जी झाली तर तो ते औषध लिहितो आणि त्याची मर्जी व्हावी यासाठी औषधी कंपन्या त्याला खुष करतात. खुष करण्यासाठी पूर्वीच्या काळी साध्या साध्या भेटवस्तू दिल्या जायच्या पण आता भेटवस्तूंची मजल फार पुढे गेली आहे. मोटारकारपर्यंत भेटवस्तू दिल्या जायला लागल्या आहेत. वैद्यकीय व्यवसायातले हे रॅकेट रुग्णांच्या पैशातून चाललेले आहे, रुग्णांची लूट होत आहे आणि रॅकेटियर्स चैनीत जगत आहेत.

Leave a Comment