मुद्याऐवजी सरळ गुद्यावर

संवाद कौशल्याचे महत्व सांगताना एका व्यवस्थापन तज्ज्ञाने म्हटले आहे की, आपल्या समाजातले लोक योग्य वेळी सॉरी म्हणायला शिकले तर आपल्या जीवनातले निम्मे प्रश्‍न सुटून जातील. या म्हणण्याची आठवण पदोपदी व्हावी इतका आपल्या समाजातला संवाद सध्या बिघडलेला आहे. आपण मेंदूवरचा आणि जिभेवरचा ताबा गमावून बसलो आहोत. त्यामुळे छोट्या-मोठ्या घटनांनी प्रक्षुब्ध होऊन आपण क्षणार्धात एकमेकांचे गळे पकडायला लागलो आहोत. अशा प्रकारे हिंसक पद्धती अवलंबिल्यास प्रश्‍न सुटण्याच्या ऐवजी तो अधिक गंभीर होत असतो याची जाणीव आपल्याला राहिलेली नाही. त्यामुळे आपण सध्या माध्यमांमध्ये एक विचित्र परिस्थिती अनुभवत आहोत. एका बाजूला आपण विकास हा आजच्या काळाचा धर्म झाला पाहिजे असे मानतो. परंतु आपल्या माध्यमांमधून विकासाची चर्चा किती होते आणि नेत्यांच्या बेजबाबदारपणाने केलेल्या विधानांवर किती चर्चा होत असते याचा हिशेब मांडला तर असे लक्षात येते की, माध्यमांचा बराच वेळ आणि जागा निरर्थक उद्गारांवर चर्चा करण्यात वाया जाते.

दिग्विजयसिंह आपल्या भाषणात काय म्हणाले? नितेश राणे यांनी काय ट्विट केले आणि शोभा डे यांनी काय अव्यवहार्य सूचना मांडली यावर आपण आपली शक्ती, बुध्दी आणि वेळ खर्च करत आहोत. मुळात बेजबाबदारपणे बोलणारे लोकही संयम सोडून बोलत आहेत आणि प्रतिक्रिया व्यक्त करणारे सुद्धा संयम सोडून प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. आपण सारेच लोक संयमाचा बांध ङ्गोडून वहात चाललो आहोत. शोभा डे यांच्यावर टीका करताना राज ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी सभ्यपणाच्या मर्यादा ओलांडल्या. अटलबिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण आणि अलीकडच्या काळात शरद पवार कसलीही प्रतिक्रिया व्यक्त करताना ङ्गारच संयमाने व्यक्त करण्याबाबत प्रसिद्ध आहेत. वाजपेयी तर कोणत्याही महिलेच्या विरुद्ध बोलताना एकही अवाजवी शब्द खपवून घेत नसत. पण राज ठाकरे यांनी शोभा डे यांच्या घटस्ङ्गोटाचा उल्लेख केला आणि जितेंद्र आव्हाड यांनी शोभा डे यांचा मेंदू शरीराच्या बाहेर आहे का, असा प्रश्‍न विचारला. या दोघांच्या या प्रतिक्रिया आजच्या राजकीय संस्कृतीच्या द्योतक असतील तर चिंता व्यक्त करण्याशिवाय आपल्या हातात काही नाही. चंद्रपूरच्या पूरग्रस्त लोकांनीही काल असाच आपल्यातल्या संयमाचा अभाव दाखवून दिला.

चंद्रपूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडलेला आहे. मात्र या जिल्ह्याचे पालकमंत्री गावाला भेट देण्यासाठी उशीरा आले. अतिवृष्टीचा तडाखा बसून आठवडा झाला, आता थोडासा दिलासा मिळत आहे आणि यावेळी मंत्री येत आहेत. या गोष्टीने लोक चिडले आणि त्यांनी पालकमंत्री संजय देवतळे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. घोषणाबाजी करणार्‍या लोकांना पोलिसांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु हे लोक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यातल्या काही लोकांनी तर दगडङ्गेक केली. त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. दगडङ्गेक करणार्‍या नागरिकांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. काही निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. मंत्र्यांनी लोकांच्या संकटाच्या प्रसंगात धावून गेले पाहिजे ही गोष्ट खरी आहे. मात्र तसा काही कायदा नाही. साधारणत: लोकांच्या अडचणीला धावून जाणे हे सरकारचे कर्तव्य असतेच. त्यासाठी सरकारी यंत्रणा कार्यरत झालेली असते. त्यामुळे मंत्र्यांनीच स्वत: हजर राहिले पाहिजे असे काही म्हणता येत नाही. ते स्वत: हजर राहिले तर बरेच आहे, पण अगदी पुराचे संकट भरात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून संकटात उडी घ्यावी ही अपेक्षा चुकीची आहे आणि मंत्र्यांनी असा जीव धोक्यात घातलेला नसल्यामुळे कोणी प्रक्षुब्ध होत असेल तर तो प्रतिक्रियेचा अतिरेक होईल.

आपण संकटात सापडतो तेव्हा मंत्र्यांनी धावून आले पाहिजे हा आपला हक्क आहे असा लोकांचा गैरसमज झालेला आहे आणि त्यात हक्काची नको एवढी जाणीव झालेली दिसत आहे. सार्वजनिक स्वरूपाच्या हक्कांच्या बाबतीत आपण जागरूक नाही, पण वैयक्तिक हक्क मात्र आपण जपत असतो. वैयक्तिक हक्क बजावताना सुद्धा आपण तो निदान संयमाने तरी बजवावा एवढेही आपल्याला समजत नाही. आपला हक्क आपल्याला मिळत नाही असे दिसताच लोक प्रक्षुब्ध होतात आणि हिंसक पद्धतीने व्यक्त होतात. प्रतिक्रिया व्यक्त करताना आपण संयम विसरून चाललो आहोत. एखादी घटना आपल्याला प्रक्षुब्ध करणारी घडली तरी तिची प्रतिक्रिया आपण संयमाने दिली पाहिजे. हा सुसंस्कृतपणा कमी झाल्याचे जाणवत आहे. नेमके कालच सोलापूर येथे आमदार दिलीप माने यांनी भर बाजारपेठेत किरकोळ कारणावरून एका दुकानावर हल्ला केला. आमदार हे जनतेचे नेते असतात आणि समाजात होणारे वाद मिटवणे हे त्यांचे काम असते. परंतु हे काम विसरून आमदार स्वत:च जर दुकानांवर हल्ले करायला लागले तर सामान्य माणसेही पदोपदी मारामार्‍याच करायला लागतील.

Leave a Comment