भाजपच्या बैठकीपासून आडवाणी पुन्हा दूर

नवी दिल्ली – चार राज्यांच्या विधानसभा तसेच पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक सुरू झाली असून भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी तसेच मुरली मनोहर जोशी मात्र या बैठकीपासून दूर राहिले आहेत.

गोव्यात झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीला आडवाणी गैरहजर राहिले होते. या बैठकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची लोकसभा निवडणुकांचे भाजपचे प्रचार प्रमुख म्हणून निवड करण्यात आली होती. मोदींच्या निवडीवर रुसलेल्या आडवाणी यांनी थेट बंडाचे निशाण फडकवत कार्यकारिणीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर महत्प्रयासांनी आडवाणी यांचे मन वळवण्यात पक्षाला यश आले होते.

दरम्यान, पक्षात आता सर्व काही आलबेल असल्याचे दाखवले जात असतानाच आडवाणी आज दिल्लीतील संघ व भाजप नेत्यांच्या महत्वाच्या बैठकीला गैरहजर राहिल्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. आजच्या बैठकीत लवकरच होणार्‍या चार राज्यांच्या निवडणुका तसेच लोकसभा निवडणुकांबाबत रणनिती आखण्यात येणार आहे. याच बैठकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केले जाण्याचीही शक्यता आहे.

चार राज्यांच्या निवडणुकांची अधिसूचना जारी होताच मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यावर बैठकीत एकमत होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. भाजपसाठी अशा महत्वाच्या बैठकीत आडवाणी गैरहजर असल्याने पक्षाने तातडीने खुलासा करत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला आहे. तामिळनाडूत हत्या झालेल्या भाजप नेत्याच्या कुटुंबियांचे सात्वन करण्यासाठी आडवाणी गेले आहेत. त्याचे वेगळे अर्थ काढण्याची गरज नाही, असे भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी सांगितले.