नवी दिल्ली – गुजरातचे मुख्यमंत्री आणि प्रचारप्रमुख नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्यापूर्वी परवानगी घ्या, असे फर्मान काँग्रेसचे कार्याध्यक्ष राहुल गांधींनी काढलंय. टीव्हीवरील चर्चेत बोलणार्या व्यक्तींनी याबाबतची परवानगी घ्यावी असंही सांगण्यात आलंय. ही परवानगी देण्यासाठी दोन संयोजक नेमण्यात आले आहेत. काँग्रेसचा कुणीही प्रवक्ता परवानगीशिवाय बोलणार नाही.
मोदींबद्दल कुणीही बोलायच्या अगोदर संयोजकांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. पक्षाने सांगितलेल्या माहितीपेक्षा अधिकची माहिती देण्यास प्रवक्त्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची राजकीय वाकयुद्धात नेहमी सरशी होत असल्याचं पाहून, काँग्रेसने हा निर्णय घेतला असल्याची चर्चा आहे. काँग्रेसमधील काही नेत्यांनी काही दिवसांपूर्वी फक्त नरेंद्र मोदीचं नाही, तर महागाईविषयीही बेजबाबदार वक्तव्य केली होती.
अभिनेते आणि काँग्रेस नेते राज बब्बर यांनी मुंबई 12 रूपयांत जेवण मिळतं असे वक्तव्य केले होते. यावरून काँग्रेस पक्षावर सर्वसामान्यांमध्ये राग दिसून आला होता. काँग्रेस नेत्यांनी बेजबाबदारपणे केलेली वक्तव्य पक्षाला नाहक भोवत असल्याने, काँग्रेस पक्षाने मीडिया मॅनेजमेंट करून हा निर्णय घेतला, असल्याचे सांगण्यात येत आहे.