वॉशिग्टन दि.२ – घरात, झाडाझुडपांवर जाळी विणणारे कोळी (स्पायडर) हा नेहमीच कुतुहलाचा विषय असतो. कोळ्याचे जाळे विणण्यातील कौशल्य वादातीत आहे. मात्र माणूस अथवा अन्य सजीव प्रजातींप्रमाणेच प्रत्येक कोळ्यात स्वतःची वेगळी वैशिष्ठ्ये असतात व यानुसारच त्यांची जीवनशैली ठरते असे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून सिद्ध झाले आहे.
लेना ग्रिस्टेड या संशोधिकेने या संदर्भात केलेले संशेाधन सांगते की कोळ्यातही भांडखोर, शांत,मायाळू, बोल्ड, लाजाळू असे सर्व प्रकार असतात आणि थोड्या निरीक्षणाने हे कोळी वेगळे ओळखताही येतात. त्यांनी अति लाजाळू आणि अति बोल्ड अशा स्वभावाचा धागा पकडून हे संशोधन केले. तेव्हा त्यांना आढळले की कोळ्यांच्याही कॉलनीज असतात. आणि कॉमन कामे एकत्रपणे पार पाडली जातात. भक्ष्य पकडणे, नवजातांचे संगोपन, खायला घालणे, जाळी विणणे, देखभाल करणे अशी कामांची विभागणी असते आणि प्रत्येक विभागात काम करणारे कोळी सारख्या स्वभावाचे असतात.
कोळ्यांची पहिली कामगार फळी आकाराने नेहमीच्याच कोळाइतकी असते मात्र ती जास्त आक्रमक असते. ही फळी अॅटॅकर म्हणून काम करते. त्यात येणारे कोळी बोल्ड स्वभावाचे असतात. लाजाळू स्वभावाचे कोळी नवजातांचे पालनपोषण, जाळी विणणे, घरट्यांची देखभाल अशी कामे करतात. कोळी आपसात संवादही करतात. एकाच कोळ्याशी दीर्घकाळ संवाद करणारे कोळी शांत असतात तर सतत नवनवीन कोळ्यांच्या संपर्कात येणारे कोळी अधिक लवचिव व विविध व्यक्तीमत्त्वाचे असतात असेही लेना यांचे म्हणणे आहे. हे संशोधन रॉयल सोसायटी जर्नल मध्ये प्रकाशित झाले आहे.