उद्धव राजना एकत्र आणण्यासाठी मोदी सक्रीय

मुंबई दि.२ – मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात दिलजमाई व्हावी आणि महाराष्ट्रात विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता उखडून टाकावी यासाठी भाजप निवडणुक प्रचारप्रमुख व गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी सक्रीय झाले असल्याचे अंतर्गत वर्तुळातून सांगितले जात आहे. अर्थात मोदींचे हे प्रयत्न अत्यंत शांतपणे आणि कुणाच्याही डोळ्यात भरू नये अशा प्रकारे सुरू असल्राचेही सांगितले जात आहे.

महाराष्ट्रात महायुती म्हणजे मनसेसह निवडणुका लढविल्या तर सत्ता मिळणे युतीला सहज शक्य होणार आहे व त्याचा फायदा लोकसभा निवडणुकांतही होणार आहे. या दृष्टीने उद्धव व राज यांनी एकत्र यावे यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. मात्र त्यांना अजून यश आलेले नाही. नरेंद्र मोदी यांनी अलिकडच्या काळात दोन वेळा मुंबईला भेट दिली, तेव्हा त्यांनी पक्षातील त्यांच्या विश्वासाच्या कांही वरीष्ठ नेत्यांवर उद्धव राजला एकत्र आणण्याची कामगिरी सोपविली असल्याचेही समजते. महाराष्ट्राचे भाजप प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या दोन महिन्यात राज ठाकरे यांच्याबरोबर तीन बैठका केल्या आहेत तसेच उद्धव ठाकरे यांच्यासोबतही अनेक वेळा चर्चा केली आहे.

मोदींनी भाजप नेत्यांसमवेत मुंबईत केलेल्या चर्चेत मनसेने वेगळ्या निवडणुका लढविल्यामुळे महाराष्ट्रात युतीचे किमान ५० जागांचे नुकसान झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले गेले आहे. त्यावर मोदींनी राजना महायुतीत आणण्यासाठी गरज पडली तर भाजपने चार दोन जागा सोडाव्यात असा सल्ला दिला आहे. मात्र हा मुद्दा संवेदनशील असल्याने अतिशय हळूवारपणे हाताळण्याचे मोदींनी ठरविले असल्याचे समजते.

भाजप नेत्यांच्या मताप्रमाणे मोदींनी स्वत;च राज ठाकरे यांना विनंती केली तर त्यांना राज यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल. मोदींनीही त्यासाठी तयारी दर्शविली आहे मात्र त्यामुळे शिवसेना नाराज होणार असेल तर निवडणूकपूर्व पेक्षा निवडणुकीनंतर मनसे भाजपच्या सोबत येईल यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. तसेच गुप्त युतीसाठीही बोलणी सुरू केली गेली आहेत.

भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांना या संदर्भात विचारले असता ते म्हणाले की कांही तरी ठोस हाती आल्याशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलू नका असा आमच्या पक्ष नेत्यांचा आदेश आहे.

Leave a Comment