केंद्रात भाजपच्या सत्तेसाठी १० लाख कार्यकर्ते सज्ज

नवी दिल्ली दि.३० – भाजप निवडणूक प्रचार समितीच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतलेल्या मोदींच्या केंद्रात भाजपचे सरकार यावे यासाठी चाललेल्या प्रयत्नांना आता १० लाखांहून अधिक कार्यकर्त्यांचे बळ मिळणार आहे. भाजपने या संदर्भात घेतलेल्या निर्णयानुसार देशाच्या कानाकोपर्‍यातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हे कार्यकर्ते काम करणार आहेत आणि पक्षाचा संदेश मतदारांपर्यंत पोहोचविणार आहेत. यातील सर्व जण भाजपचे सदस्य असतीलच असेही नाही असेही पक्षाने स्पष्ट केले असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी ते हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहेत. त्यात एसएमएस, सोशल मिडिया या बरोबरच पहिल्यांदाच मतदान करणार्‍या युवकांसाठी विशेष आय. टी. पथक स्थापले गेले आहे. हे पथक मतदानासाठी योग्य वय असलेल्या मतदारांनी मतदान यादीत नांवे नोंदवावी यासाठीही जागृती करणार आहे.

भाजप मधील वरीष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षाचे हे धोरण यशस्वी ठरेल असे संकेत मिळत आहेत कारण मोदी सध्या देशातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत. त्यांना सोशल मिडियातून लोकप्रियताही लक्षणीय आहे. २००९ च्या निवडणुकात भाजपची मतांची टक्केवारी १९ टक्के होती ती लक्षणीयरित्या वाढावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. हैद्राबाद, कोलकाता, गुरगांव, भोपाळ, मुंबई, जयपूर, लखनौ, चेन्नई शहरातील अनेक कार्यकर्त्यांशी संपर्क साधला गेला असून त्यांच्यावर जबाबदार्‍या सोपविल्या गेल्या आहेत. सध्या देशाच्या २१ राज्यात आणि तीन केंद्रशासित प्रदेशात प्रचार मोहिमेचे काम सुरू केले गेले आहे असेही समजते.

केंद्रात भाजपला १८० ते २०० पर्यंत जागा मिळतील असे कांही सर्वेक्षणातून दिसून आले आहे. या जागा सरळ २७२ वर नेऊन ठेवण्याचा निर्धार पक्षाने केला असून त्यासाठी देशभर अविरत काम सुरू केले असल्याचे सांगण्यात येत आहे.