इराणच्या ताब्यातून भारतीय मच्छिमारांना सोडवा- जयललिता

चेन्नई – इराणने गेल्या वर्षी 16 भारतीय मच्छिमारांना अटक केली असून, त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न करण्याची विनंती करणारे पत्र तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पाठवले आहे. सौदी अरेबियामधील एका कंपनीमध्ये कंत्राटी कामगार असलेले हे मच्छीमार अनावधनाने इराणच्या अखत्यारीत येणार्‍या सागरी क्षेत्रात घुसले होते. त्यामुळे त्यांना इराणने अटक केली होती.

रामनाथपुरम, नागपट्टीणम आणि कन्याकुमारी जिल्ह्यांमधील त्यांच्या कुटुंबीयांची जयललिता यांनी भेट घेतली. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, कोणतीही कायदेशीर मदत न मिळू शकलेल्या या मच्छीमारांना इराणमधील न्यायालयाने सहा महिन्यांचा कारावास आणि 5,750 डॉलर्सचा जबर आर्थिक दंड सुनावला आहे. मात्र, आता शिक्षेची मुदत संपल्यानंतरही दंड भरता येत नसल्याने हे मच्छीमार अद्याप तुरुंगांमध्येच खितपत पडले आहेत. विशेष म्हणजे, भारतीय दूतावासाने या मच्छीमाराच्या सुटकेविषयी कोणताही संपर्क प्रस्थापित केलेला नाही. त्यामुळे, तेहरान व सौदी अरेबियामधील दूतावासांनी या मच्छीमाराच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत असे जयललिता यांनी म्हटले आहे.

Leave a Comment