नवी दिल्ली – बिहारी नागरिकांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रवक्ते शिरीष पारकर यांनाही वॉरंट जारी करण्यात आले आहे. प्रत्यक्ष कोर्टात हजर न राहण्याची विनंतीही कोर्टाने फेटाळली आहे. तसंच त्यांना 24 ऑगस्टला हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.
वाय दर्जाची सुरक्षा असल्याने, प्रत्यक्ष कोर्टात हजर राहण्यापासून सूट मिळावी, अशी विनंती राज ठाकरे यांनी केली होती. तर प्रकृती कारणास्तव शिरीष पारकर यांनीही याबाबत विनंती केली होती. मात्र कोर्टाने ही विनंती फेटाळली आहे. त्यामुळे या दोघांनाही आता कोर्टात हजर राहणं अनिवार्य आहे. त्यामुळे मनसेसाठी आजचा दिवस धक्कादायक ठरला आहे. याआधी, काहीच मिनिटांपूर्वी आमदार प्रविण दरेकर यांच्यावर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. विधानसभेत मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावेळी, दरेकर यांनी गोंधळ घातल्याने त्यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलं आहे.