रायपूर – छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग हे सात वर्षांपूर्वीच्या इंदिरा प्रियदर्शिनी महिला नागरी सहकारी बँकेच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात गुंतले असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे नेते भूपेश बाघेल यांनी केला आहे. श्री. बाघेल आणि शैलेश नितीन त्रिवेदी या कॉंग्रेसच्या दोघा नेत्यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला आणि आरोपाच्या समर्थनासाठी एक ध्वनीङ्गित वाजवून दाखवली.
या भ्रष्टाचार प्रकरणातला मुख्य आरोपी उमेश सिन्हा याची नार्को टेस्ट झाली होती आणि या चाचणीच्या दरम्यान तो जे काही बोलला तो मजकूर या ध्वनीङ्गितीमध्ये आहे. प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नंदकुमार पटेल यांचे चिरंजीव दिनेश पटेल यांनी या भ्रष्टाचाराची पाळेमुळे खोदून काढली असून १५ जून रोजी ते या संबंधातली माहिती जाहीर करणार होते. परंतु दिनेश पटेल यांचा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला, त्यामुळे हा गौप्यस्ङ्गोट होऊ शकला नाही.
उमेश सिन्हा याने मुख्यमंत्री रमणसिंग आणि राज्याच्या काही मंत्र्यांना करोडो रुपये दिले असल्याची कबुली पोलिसांना दिली असून त्याची ही कबुली या ध्वनीङ्गितीमध्ये नोंदण्यात आलेली आहे. हे प्रकरण २००६ सालचे असून ते बर्याच दिवसांपासून गाजत आहे. यापूर्वीही या ध्वनीङ्गितीची चर्चा झालेली आहे आणि या ध्वनीङ्गितीतला आवाज बँकेचा व्यवस्थापक उमेश सिन्हा याचा नसल्याचे दिसून आले आहे, असा खुलासा भाजपातर्ङ्गे करण्यात आला आहे.
या संबंधात व्यवस्थापक उमेश सिन्हा आणि बँकेच्या काही संचालकांना अटक करण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. या बँकेतल्या भ्रष्टाचाराची राज्य सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आलेली आहे आणि या संबंधात कोणाला पाठीशी घातले जात नाही. मुख्यमंत्री आणि अन्य कोणतेही मंत्री या प्रकरणात गुंतलेले नाहीत, असा खुलासा राज्याचे शिक्षणमंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी केला आहे.