इस्लामाबाद – पुरुषांशिवाय बाजारात जाऊ नये अशी घोषणा उत्तर-पश्चिम पाकिस्तानात करण्यात आली आहे. हा निर्बंध रमजान महिन्यासाठी घालण्यात आला आहे. या महिन्यात पुरुषांचे लक्ष विचलित होऊ नये, यासाठी हा निर्बंध घातला आहे. बाजारात जाताना एकट्या दुकट्या बाहेर पडलात तर तुम्हाला अटक होऊ शकते. महिलांना पुरुषांशिवाय एकट्याने बाहेर पडण्यास प्रतिबंध घातला गेला असल्याची माहिती पोलीस अधिकार्यांनी दिली आहे.पाकिस्तानातील पख्तुनख्वा शहरातील कराक या जिल्ह्यात एका मस्जिदमध्ये ही घोषणा करण्यात आलीय.
या घोषणेनुसार एकटी महिला खरेदीसाठी बाहेर पडली तर तिला अटक होऊ शकते. तसेच सामान विकणार्या दुकानदारालाही सामान दिल्याबाबत शिक्षा होऊ शकते, अशी सूचना जिल्हा पोलिस अधिकारी फजल हनीफ यांनी दिली आहे. सगळ्यात मह्त्त्वाची गोष्ट अशी की, या घोषणेचे समर्थन पोलिसांकडूनच होत आहे. रमजानच्या महिन्यात दिवसभर रोजा पाळला जातो. यादरम्यान पुरुषांचे लक्ष विचलित होऊ नये या हेतूने महिलांवर हा निर्बंध घातला गेला आहे. दुकांनदारानी मात्र या निर्बंधाला विरोध केला आहे. ’या निर्णयामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होऊ शकतो’ असे त्यांनी म्हटले आहे. काही कुटुंबांनीही या निर्णयाला नापंसती दर्शवली आहे. मात्र, हा निर्बंध किती काळ पाळला जातो, आणि यामुळे नेमका काय फरक पडणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल.