मुशर्रफ कन्या आलिया ला हत्येच्या धमक्या

इस्लामाबाद दि.20 – पाकिस्तानचे माजी लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांची कन्या आलिया रझा हिला गेले कांही दिवस ठार करण्याच्या धमक्या येत असून तिच्या जीवाला धोका असल्याचा इशारा पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने सिंध सरकारला दिला असल्याचे समजते. आलिया आर्किटेक्ट असून तिचे पती चित्रपट दिग्दर्शक असीम रझा यांच्यासोबत कराचीत वास्तव्यास आहे. पाकिस्तानात बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांकडून आलियाला हत्या केल्या जाण्याच्या धमक्या येत असल्याने सिंध सरकारला तिच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्याचे तसेच तिच्यासाठी पुरेसे सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश दिले गेले आहेत असे समजते.

मार्च मध्ये मुशर्रफ दीर्घ काळचा परदेशातला अज्ञातवास संपवून पाकिस्तानात परतले आहेत. मात्र येथे आल्यानंतर त्यांच्यावर अनेक प्रकारचे खटले चालविले जात असून त्यांना सध्या इस्लामाबादेतील त्यांच्याच फार्म हाऊसवर नजरकैदेत ठेवले गेले आहे. मुशर्रफ यांनाही तालिबानी अतिरेक्यांनी ठार करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तानात नव्याने आरूढ झालेल्या शरीफ सरकारने मुशर्रफ यांच्याविरोधातील सर्व खटले लढविण्याचा निर्णय घेतला असून सरकारतर्फे त्यांना मृत्यूदंड अथवा आजन्म कारावासाची शिक्षा देण्याची मागणी न्यायालयात केली जाणार आहे असेही समजते.
———