
नवी दिल्ली – हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान समजला जाणार्या भारतरत्न पुरस्कारासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केली आहे. भारतरत्न पुरस्कारासाठी ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस करणारे पत्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांना पाठवण्यात आल्याची माहिती क्रीडा सचिव पी.के.देब यांनी दिली. भारतरत्न पुरस्करासाठी ध्यानचंद यांचे नाव निश्चित करण्यापूर्वी या शिफारशीचा अभ्यास करण्यात येईल.
ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली सहा जणांच्या शिष्टमंडळाने 12 जुलैला क्रीडा मंत्री जितेंद्र सिंह यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी भारतरत्न पुरस्कारासाठी ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस करण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदीही होते. पुस्कार मिळो अथवा न मिळो पण भारतरत्न पुरस्कारासाठी क्रीडा मंत्रालयाकडून त्यांच्या नावाची शिफारस होणे हा एक सन्मानच आहे अशी प्रतिक्रिया अशोककुमार यांनी दिली. ध्यानचंद यांना हा पुरस्कार मिळावा यासाठी आपण आपल्यापरीने पूर्ण प्रयत्न करु अशी हमी क्रीडा मंत्र्यांनी दिली आहे. यावर्षी अन्य कुठल्याही नावाची शिफारस झालेली नाही. त्यामुळे वाद होण्याची शक्यता नाही. यावर्षी पुरस्कार मिळेल अशी आम्हाला आशा आहे असे अशोककुमार यांनी सांगितले. ध्यानचंद यांना पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करणा-या बिशनसिंग बेदींचेही त्यांनी कौतुक केले. भारतरत्न पुरस्कार सचिन तेंडुलकरला आधी मिळाला पाहिजे कि, ध्यानचंद यांना, यावरुन काहीजणांचे मतभेद आहेत.
1928 मध्ये अँमस्टरडॅम, 1932 मध्ये लॉस एंजिलिस आणि 1936 मध्ये बर्लिन ऑलिंपिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून देण्यात ध्यानचंद यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 1979 मध्ये त्यांचे निधन झाले. 2011 मध्ये संसदेच्या 82 सदस्यांनी भारतरत्न पुरस्कारासाठी ध्यानचंद यांच्या नावाची शिफारस केली होती. पण त्यावेळी सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले होते. त्यानंतर 2012 मध्ये क्रीडा मंत्रालयाने मेजर ध्यानचंद, ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा आणि र्गियारोहक तेनझिंग नॉरगे यांच्या नावाची शिफारस केली होती. बीसीसीआयने सचिन तेंडुलकरच्या नावाची शिफारस केली नव्हती त्यामुळे क्रिडा मंत्रालयाने त्याचे नाव पाठवले नव्हते.