लंडन – इयान बेलची फलंदाजी पुन्हा एकदा इंग्लंडसाठी उपयुक्त ठरली आहे. त्यामुळे अँशेस मालिकेतील दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा संघ संकटात सापडला असताना बेल त्यांच्या मदतीला धावून आला. इयान बेलच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर सात बाद २८९ धावा काढल्या.
लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडचा कर्णधार अँलेस्टर कुकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चांगलाच अंगलट आला. २८ धावांत इंग्लंडचे आघाडीचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. शेन वॉटसनने इंग्लंडला पहिला धक्का दिला. वॉटसनने कर्णधार कुकला पाचव्या षटकात पायचीत केले. कुक १२ धावा काढून परतला. पुढच्याच षटकात रेयान हॅरिसने जो. रुटला पायचीत करून इंग्लंडला आणखी एक हादरा दिला. इंग्लंडचे दोन्ही सलामीवीर अवघ्या २८ धावांत तंबूत परतले.
इंग्लंडची टीम ३ बाद २८ अशी संकटात सापडली होती. यानंतर जोनाथन ट्रॉट आणि इयान बेल यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. ट्रॉटने ८७ चेंडूंत ११ चौकारांसह ५८ धावा काढल्या. त्यालासुद्धा हॅरिसनेच बाद केले. इयान बेलच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने पहिल्या दिवसअखेर सात बाद २८९ धावा काढल्या.