पाकिस्तानी कापड आयात करात कपातीचा निर्णय

नवी दिल्ली दि.१७ – पाकिस्तानातून आयात करण्यात येणार्‍या टेक्स्टाईल वरील आयात करात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा विचार भारत सरकार करत आहे. सध्या पाकिस्तानातून आयात होणारया कापडावरचा आयात कर ३० ते ३५ टक्के असून तो ५ टक्क्यांवर आणण्याचा विचार सुरू असल्याचे वाणिज्य विभागातील वरीष्ठ अधिकार्‍यानी सांगितले.

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील व्यापार संबंध सुरळीत व्हावेत यासाठी कांही उपाय योजले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून आयात होणार्याप कापड्यावरील आयात कर कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेजारी बांग्लादेशातून आयात होणार्‍या कापडावरील आयात शुल्क २०११ मध्ये पूर्ण पणे माफ करण्यात आले आहे. मात्र पाकिस्तानच्या बाबतीत ते पूर्ण माफ केले जाणार नाही असे सांगून हे अधिकारी म्हणाले की जेव्हा पाकिस्तान मोस्ट फेव्हर्ड नेशनच्या यादीत भारताला स्थान देईल तेव्हा कदाचित हे शुल्क पूर्ण माफ केले जाईल.

पाकिस्तानातून निर्यात होणार्‍या मालात वस्त्रोद्योगाचा वाटा सर्वाधिक आहे. भारतात पाकिस्तानातून आयात होणार्‍या वस्तूत कापड हे संवेदनशील वस्तूंच्या यादीत आहे. त्यामुळेच पाकिस्तानातून आयात केल्या जाणार्‍या कापडावर निर्बंध आहेत. नव्यानेच सत्तेवर आलेल्या शरीफ सरकारने वस्त्रोद्योगाचे महत्त्व ओळखून वाणिज्य मंत्रालयाचे नामकरण वाणिज्य व वस्त्रोद्योग मंत्रालय असे केले असून शरीफ यांनी स्वतःकडेच हे खाते ठेवले आहे असेही हे अधिकारी म्हणाले.