मुंबई दि.१७ – पावसाची रिमझिम सुरू असतानाच अवघ्या महाराष्ट्रला वेध लागतात ते गणपती उत्सवाचे. मात्र महागाईच्या चटक्याने यंदा सार्वजनिक मंडळांनाच नव्हे तर घरात उत्सव साजरा करणार्या मंडळींनाही गणपतीबाप्पाच्या उत्सवात खर्चाचा हात आखडताच घ्यावा लागणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाच्या वर्षी गणेशाच्या मूर्ती गतवर्षीच्या तुलनेत ३५ ते ४० टक्के महाग होणार आहेत. परिणामी यंदा छोट्या मूर्तीवरच भाविकांना समाधान मानण्याची वेळ येणार आहे.
गणपती मूर्ती व्यापारी या संदर्भात म्हणाले की गतवर्षी साधारण १ फूट उंचीची मूर्ती १ हजार ते १२०० रूपयांच्या दरम्यान होती. यंदा त्याची किमत १५०० ते १८०० रूपयांच्या दरम्यान आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे दर वाढले आहेत. शिवाय इंधन दरवाढ आणि मजुरीत झालेली वाढ तसेच वाहतूक खर्च वाढल्याने मूर्ती उत्पादकांचा खर्चही लक्षणीयरित्या वाढला आहे. परिणामी मूर्ती महागल्या आहेत.
गणपती उत्पादक व कलाकार विजय खातू म्हणाले की कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. गणपती तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्या जागांची भाडीही वाढली आहेत. शिवाय कच्चा माल साठवून ठेवता येत नाही कारण पावसात तो खराब होण्याची भीती असते. त्यामुळे ऐनवेळीच माल घ्यावा लागतो. महागाईमुळे प्लॅस्टर ऑफ पॅरिस विकणार्या व्यापार्यांवनी दरवाढ केली आहेच. पण कलाकार, मजूर यांनीही मजुरी वाढविली आहे. मध्यमवर्गीयांवर यामुळे यंदाच्या उत्सवात खर्चाचा बोजा आणखी वाढणार आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार मूर्तींच्या किमती जवळजवळ ४० टक्कयांनी वाढल्या आहेत. मात्र हा सण महत्त्वाचा असल्याने सजावटीत कपात करावी लागेल तसेच बाप्पाच्या छोट्या मूर्तीवर समाधान मानावे लागणार आहे.