झुकन शहराला १०० वर्षांनंतर मिळणार सूर्यप्रकाश

नॉर्वे दि.१७ – झुकन सिटी (rjukan) या नॉर्वेतील उद्योगनगरीला यंदा १०० वर्षाच्या इतिहासात प्रथमच हिवाळ्यात कांही काळ सूर्यप्रकाश मिळू शकणार आहे. खोल दरीत बसलेल्या या शहरात हिवाळ्यात सूर्यप्रकाश येत नाही व त्यामुळे येथील नागरिक सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी केबल कार वापरून शेजारील उंच डोगरमाथ्यावर जातात असे समजते. येत्या सप्टेंबरमध्ये मात्र १०० वर्षनंतर प्रथमच या नगरीला सूर्यस्नान घडण्याचा योग आधुनिक तंत्रज्ञानामुळे प्राप्त झाला आहे.

झुकनच्या टाऊन हॉलमधील चौकात हिवाळ्यात सूर्यप्रकाश यावा म्हणून कडेच्या डोंगरांवर ४५० मीटर उंचीचे भव्य असे तीन आरसे बसविले गेले आहेत. या आरशातून परावर्तित होणारा सूर्यप्रकाश खालच्रा चौकात पडेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ५० लाख क्रोनर ( १ क्रोनर – भारतीय ५ रूपये ) इतका खर्च आला असून आरसे बसविण्याचे हे काम १ जुलै २०१३ ला सुरू करण्यात आले होते, ते नुकतेच पूर्ण झाले आहे.

येथील पर्यटन कार्यालयातील अधिकारी करीन रिमो म्हणाले की आरसे बसविण्याची ही कल्पना या शहराच्या स्थापनेपासून म्हणजे १९०७ सालापासूनच होती. मात्र त्यासाठीचे तंत्रज्ञान आमच्याकडे नव्हते. त्यासाठी खर्चही अधिक येणार होता म्हणून आरशांऐवजी केबल कार बसविण्यात आली. हिवाळ्यात केबलकार मधून नागरिक शेजारच्या उंच डोंगरमाथ्यांवर जाऊन सूर्यप्रकाश अंगावर घेत असत. गेली पाच वर्षे या प्रकल्पाची चर्चा सुरू होती मात्र आता तो पूर्ण झाला आहे.